थोड्याच काळात आकाशात उडणार नौका

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आता कोणतीच गोष्ट अशक्य राहिलेली नाही. कधीकाळी स्वप्नवत वाटणाऱ्या अनेक गोष्टी आज प्रत्यक्षात आल्या आहेत. विमानांची अप्रूप संपून आता उडत्या कार्स आणि बाइक्स अवतरल्या आहेत. लवकरच त्यात उडत्या नौकांची भर पडणार आहे. इटलीच्या लाझारिनी या डिझायनर फर्मने पाण्यात चालणारे आणि हवेतही उडू शकणार याट तयार केले आहे. हे याट लग्झुरीयस आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ५०० फुट लांबीचे हे याट पाण्यात चालेल तसेच हवेत उड्डाण करू शकेल. हिलीयम वायूचा त्यासाठी वापर केला गेला असून हे याट कार्बन फायबर पासून बनविले गेले आहे. प्रत्यक्षात ही दोन याट असून एका छोट्या ब्रिजने एकमेकांना जोडली गेली आहेत. हिलीयम गॅसचे दोन मोठे बलून त्यांना जोडले गेले आहेत. हा वायू हवेच्या तुलनेत हलका असल्याने याट आकाशात जाऊ शकते आणि हवेतून उडण्यासाठी त्याला इलेक्ट्रिक प्रोपेलर बसविले गेले आहेत. सलग ४८ तास हे याट हवेत उडू शकते.

या याटमध्ये सर्व सुखसोयी दिल्या गेल्या आहेत. येथे डायनिंग हॉल, हेलिपॅड, स्विमिंग पूल, ११ केबिन असून त्यातून २२ प्रवासी प्रवास करू शकतात. हे याट बनविण्यासाठी ६३ कोटी डॉलर्स म्हणजे ५१ अब्ज रुपये खर्च आला आहे. यातून प्रवास करण्यासाठी किती खर्च करावा लागेल याचा अंदाज अजून दिला गेलेला नाही. मिडिया रिपोर्ट नुसार अन्य काही कंपन्या सुद्धा या कल्पनेवर काम करत आहेत. त्यामुळे भविष्यात आकाश मार्गे प्रवासाचा आणखी एक पर्याय खुला होणार आहे.