जाणून घ्या नार्को आणि पॉलिग्राफी टेस्टमधील फरक

नवी दिल्ली: मागच्या दोन आठवड्यापासून श्रद्धा वालकर हत्याकांडाची माध्यमातून सातत्याने चर्चा होत आहे. त्यातील आरोपी आफताब पूनावाला याची नार्को टेस्ट आणि पॉलिग्राफी टेस्ट करण्याची परवानगी न्यायालयाने पोलिसांना दिली आहे. त्यामुळे या लाय डिटेक्टर टेस्ट नेमक्या काय असतात, याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

या हत्याकांडाच्या तपासात आरोपी आफताब याची प्रथम पॉलिग्राफी टेस्ट करण्यात येणार आहे. नंतर आवश्यकता वाटल्यास नार्को टेस्ट करण्यात येईल. जाणून घेऊ या दोन्ही चाचण्यांमधील फरक…

पॉलिग्राफी टेस्टमध्ये कोणत्याही औषध अथवा रसायनांचा वापर केला जात नाही. आरोपी गुन्ह्याबद्दल जबाब देत असताना विशिष्ट यंत्रणेद्वारे त्याचा रक्तदाब, नाडीचे ठोके आणि घाम येण्याचे प्रमाण व वेग याची मोजणी केली जाते. त्यामुळे आरोपी नेमके काय खोटे बोलतो आहे आणि काय खरे याचा अंदाज बांधणे शक्य होते.

नार्को टेस्टमध्ये आरोपीची स्नायू यंत्रणा शिथिल करणाऱ्या औषधांचा वापर केला जातो. ही औषधे दिल्यानंतर आरोपी इच्छा असूनही खोटे बोलण्याची शक्यता नगण्य असते. या औषधांचे प्रमाण आरोपीचे वय, लिंग आणि शारीरिक स्थिती यावरून न्यायवैद्यक तज्ज्ञ निश्चित करतात.

कोणत्याही लाय डिटेक्टर चाचण्या आरोपीच्या संमतीशिवाय घेतल्या जाऊ नयेत, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. आरोपीची शारीरिक स्थिती वैद्यकीय दृष्ट्या सामान्य असेल तरच अशा चाचण्यांना न्यायालय परवानगी देते.