व्हाईट हाउस मध्ये संपन्न झाला बायडेन यांच्या नातीचा विवाह

अमेरिकेच्या इतिहासात अध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थानी म्हणजे व्हाईट हाउस मध्ये १९ वा विवाह नुकताच पार पडला आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांची नात नाओमी बायडेन हिचा विवाह पीटर नील यांच्यासोबत साउथ लॉनवर पार पडला. हा कार्यक्रम खासगी असल्याने फक्त कुटुंबीय आणि काही पाहुणे उपस्थित होते. गेल्या १० वर्षाच्या गॅप नंतर व्हाईट हाउसवर पार पडलेला हा पहिला विवाह सोहळा आहे. तसेच राष्ट्रपती कार्यकाळात येथे प्रथमच नातीचे लग्न पार पडले आहे.

नाओमीने तिच्या इन्स्टापेजवर २०२१ मध्ये नील सोबत झालेल्या साखरपुड्याची घोषणा केली होती. या वर्षीच्या सुरवातीला विवाह व्हाईट हाउसवर होणार असल्याचे सांगितले गेले होते. २८ वर्षीय नाओमी कायद्याची पदवीधर आहे तर २५ वर्षीय नील हाही कायद्याचा पदवीधर असून त्याने अगोदर व्हाईट हाउस मध्ये इंटर्नशीप केली आहे.

नाओमी, बायडेन यांचे पुत्र हंटर यांची कन्या आहे. जो बायडेन यांची ही लाडकी नात त्यांच्यासोबत व्हाईट हाउस मध्येच राहते. तिचे निओमी हे नाव बायडेन यांनी त्यांची दिवंगत कन्या निओमी वरून ठेवले होते. बायडेन यांच्या कन्येचा अपघाती मृत्यू झाला होता असे समजते. व्हाईट हाउसवर या पूर्वी म्हणजे ऑक्टोबर २०१३ मध्ये राष्ट्रपतीचा फोटोग्राफर पीट सुजा याने रोझ गार्डन मध्ये पट्टी लीज सोबत विवाह केला होता. तो या वास्तूतील १८ वा विवाह होता.