प्रेग्नंट तिबेटी महिलांचे केले जाताहेत क्रूर गर्भपात

चीनी लष्करातील डॉक्टर्स प्रेग्नंट असलेल्या तिबेटी महिलांना जबरदस्तीने पकडून त्यांचे गर्भपात घडवून आणत असल्याचे समोर येत आहे. या महिलांना अतिशय क्रूर ट्रीटमेंट दिली जात आहे. या महिलांच्या गुप्त भागात इलेक्ट्रिक उपकरणे घालून त्यातून त्यांच्या गर्भातील बाळांना इलेक्ट्रिक शॉक दिले जात आहेत. यामुळे गर्भपात होत आहेत. यात महिलांना गुंगीचे औषध न देताच शॉक दिले जात असल्याचे आरोप होऊ लागले आहेत.

भारतात धरमशाळा येथे निर्वासित म्हणून राहणारी चोन जोम ही तरुणी तिबेटी महिला संघटनाची सचिव म्हणून काम करते. तिबेट मध्ये अडकलेल्या ६० लाख महिलांचा आवाज आंतरराष्ट्रीय मंचावर पोहोचावा यासठी चोन काम करते. चोन म्हणते, आम्ही परत तिबेट मध्ये जाऊ शकत नाही पण तेथे अडकलेल्या आमच्या बांधवांच्या संपर्कात नेहमी राहतो. अनेक प्रकारे चोरून मारून आम्ही असा संपर्क ठेवतो. चीनी सेना तिबेट मध्ये अतोनात जुलूम करते आहे. अनेक महिलांना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करायला भाग पाडले जात आहे.

तिबेट मध्ये मानवाधिकार अस्तित्वात नाही. दलाई लामांचा फोटो कुणाकडे सापडला तर त्याला तुरुंगात टाकले जाते. पोलीस, सैनिक आणि सुरक्षा रक्षक कुठल्याही तिबेटी महिलेला उचलून नेतात आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार केले जातात. त्याची तक्रार कुठेही करता येत नाही. चीनी लोकांना तिबेटी संस्कृती नष्ट करायची आहे. चीनने तिबेटवर कब्जा केला तेव्हा किमान १० लाख लोकांना ठार मारले होते. तिबेटी लोकांच्या प्रत्येक हालचालीवर चीनची नजर आहे असा आरोप त्यांनी केला.

२९ एप्रिल १९५९ मध्ये १४ वे दलाई लामा यांनी चीनच्या तावडीतून शिताफीने सुटका करून भारतात आश्रय घेतला आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत आलेल्या कुटुंबात, चोनचा जन्म भारतात झाला आहे.