मेक्सिकोमध्ये 53 बॅगमध्ये सापडले मानवी अवयव

मेक्सिकोमध्ये पुन्हा एकदा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.यामध्ये एका माणसाचा कापलेला हात घेऊन एक कुत्रा रस्त्याने धावताना दिसत आहे .

कुत्रे मानवी शरीराचे अवयव घेऊन फिरताना दिसण्याची महिनाभरातील ही तिसरी वेळ आहे. या सर्व प्रकरणामागे ड्रग माफिया असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

याआधी ऑक्टोबरच्या उत्तरार्धात एक कुत्रा तोंडात मानवी डोके ठेवून पळताना दिसला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता अधिकाऱ्यांना मानवी शरीराचे तुकडे असलेल्या ५३ पिशव्या सापडल्या. मात्र, मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना अपयश आले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
27-28 ऑक्‍टोबर रोजी मेक्सिकोतील झाकाटेकास शहरात प्रथमच शहरातील लोकांनी एका कुत्र्याला मानवी डोके तोंडात घेऊन फिरताना पाहिले. लोकांनी ही बाब पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून कुत्र्याच्या तोंडातून डोके बाहेर काढले आणि पुढील तपास सुरू केला.

खुनाच्या ठिकाणाहून कुत्र्याने कवटी उचलली
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता या संपूर्ण प्रकरणामागे ड्रग्ज माफियांचा हात असल्याचे समोर आले. एका व्यक्तीची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह एटीएमजवळ ठेवला होता. तेथे एक धमकीचे पत्रही सापडले. पुढचं डोकं तुमचं असेल असं मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. या एटीएमजवळून कुत्र्याने कवटी उचलली आणि ती खाण्यासाठी निर्जन जागा शोधू लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ तस्करांमध्ये सतत टोळीयुद्ध सुरू असते. त्यामुळे शहरात अनेक खुनाच्या घटना घडत आहेत.