मुकेश झाले आजोबा, कन्या ईशाने दिला जुळ्याला जन्म

रिलायंस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पुन्हा आजोबा झाले असून त्यांची कन्या ईशा अंबानी पिरामल हिने शनिवारी, १९ नोव्हेंबर रोजी जुळ्याला जन्म दिला आहे. यात एक मुलगा आणि एक मुलगी असून मुलाचे नाव कृष्ण तर मुलीचे नाव आदिया ठेवले गेले आहे. दोन्ही बाळे आणि आई ईशा सुखरूप आणि स्वस्थ आहेत. मुकेश नीता आणि अजय- स्वाती पिरामल यांनी संयुक्त पत्रक काढून ही बातमी दिली आहे.

पिरामल उद्योगाचे प्रमुख अजय पिरामल यांचे पुत्र आनंद आणि मुकेश कन्या ईशा यांचा विवाह चार वर्षापूर्वी झाला असून महागड्या विवाहातील एक अशी त्याची प्रसिद्धी झाली होती. आनंद, पिरामल उद्योगसमुहाचे एक्सिक्युटिव्ह डायरेक्टर असून त्यांनी काही दिवसांपूर्वी पिरामल ई स्वास्थ्य आणि पिरामल रियालिटी हे दोन स्टार्टअप सुरु केले आहेत. पिरामल ई स्वास्थ्यच्या माध्यमातून सध्या ४० हजार रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

वयाच्या १६ व्या वर्षीच ईशा सर्वात कमी वयाची, अब्जाधीश वारसदार यादीत दोन नंबरवर आल्याने चर्चेत आली होती. २०१६ मध्ये तिने फॅशन पोर्टल आजो लाँच केले होते तसेच रिलायंस जिओ स्थापनेमागे ईशा हीच प्रेरणा होती असे मुकेश यांनी मागे एका मुलाखतीत सांगितले होते. विशेष म्हणजे ३१ वर्षीय ईशां आणि आकाश अंबानी ही मुकेश – नीता यांची जुळी मुलेच आहेत.