तयार राहा १ लाख रुपये किलोच्या गुळासाठी

गूळ हा पदार्थ भारतात कित्येक शतके उसापासून बनविला जातो. उसाच्या रसापासून गुऱ्हाळात गूळ तयार केला जातो. गुळाच्या किंमती सध्या खूप वाढल्या असून त्या साधारण १०० रुपये किलोवर गेल्या आहेत. मात्र आगामी काळात १ लाख रुपये किलो दराचा गूळ भारतीय खाऊ शकणार आहेत. ही किमया केली आहे सहारनपूर येथील प्रयोगशील शेतकरी संजय सैनी यांनी. सध्या मेरठ येथे सुरु असलेल्या मेळ्यात सैनी यांनी बनविलेले १०१ प्रकारचे गूळ आकर्षण ठरले असून हा गूळ हातोहात विकला जात आहे. सैनी लवकरच सोने वर्ख, चांदी वर्खाचे गूळ सुद्धा बाजारात आणणार असून त्यांची किमंत किलो ला १ लाख असेल असे सांगितले जात आहे.

सध्या सैनी यांच्याकडे महागात महाग गूळ ११ हजार रुपये किलोचा आहे. लवकरच ते जिलेबी गूळ तयार करणार आहेत. संजय म्हणतात, ‘गूळ आरोग्यदायी आहे. त्याच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. त्यांनी मेथी गूळ तयार केला असून हा गूळ खाल्ला तर हाडांची दुखणी होत नाहीत, बडीशेप ओवा आणि धने टाकून केलेला गूळ आहारात ठेवला तर पित्ताचा त्रास होणार नाही. संध्याकाळी लवंग, जायपत्री, सुंठ आणि काळी मिरी घालून केलेला गूळ खाल्ला तर कफ होत नाही. त्यांनी हिंग, सुका मेवा, विविध प्रकारच्या वनौषधी घालून सुद्धा गूळ तयार केला आहे. ज्यांनी हा गूळ खाल्ला त्यांना तो फारच आवडला असून विविध राज्यातून सैनी यांच्या गुळाला मोठी मागणी आहे.

सैनी यांनी गूळ उत्पादन कारखाना सुरु केला असून त्याचे ६०० शेतकरी भागधारक आहेत. येथे १४ कामगार आहेत. मोदी यांचे शेतकर्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचे स्वप्न सैनी यांना साकार करायचे असून थोडी कल्पकता दाखविली तर शेतकरी त्यांची कमाई चौपटीने सुद्धा वाढवू शकतात असा त्यांचा दावा आहे.