जागतिक स्वच्छतागृह दिवस

नवी दिल्ली: स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण स्वच्छतागृह ही सर्वांची महत्त्वाची गरज आहे. या विषयाबाबत लोकांमध्ये जाणीवजागृती करण्याच्या दृष्टीने १९ नोव्हेंबर रोजी जागतिक स्वच्छतागृह दिवस साजरा करण्यात येतो. या निमित्ताने स्वच्छतागृहांचे आधुनिक तंत्रज्ञान आणि गरजा याबाबत विचार आणि माहितीचे आदान प्रदान करण्यात येते.

दिल्ली येथे प्राचीन काळातील स्वच्छतागृहांचा इतिहास आणि आधुनिक स्वच्छतागृहाची माहिती देणारे संग्रहालय सुलभ इंटरनॅशनलने उभारले आहे. या संग्रहालयाची स्थापना १९९२ मध्ये करण्यात आली. या संग्रहालयाला सन २००९ मध्ये स्टॉकहोम वॉटर प्राईज देऊन गौरविण्यात आले. जगभरातील अनोख्या संग्रहालयाच्या यादीत या संग्रहालयाला टाईम नियतकालिकाने तिसरे स्थान दिले आहे.

या संग्रहालयात इ स पूर्व २५०० पासून आधुनिक काळातील स्वच्छतागृहांची छायाचित्र आणि माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. काळाच्या ओघात स्वच्छतागृहांमध्ये घडत गेलेले बदल या ठिकाणी बघायला मिळतात. तसेच आधुनिक टॉयलेट्स, टॉयलेट फर्निचर, चेंबर पॉट याची माहिती या ठिकाणी मिळते.

या संग्रहालयाला दिवसभरात शेकडो भारतीय आणि विदेशी पर्यटक भेट देतात. त्यामध्ये डॉक्टर्स, आरोग्य सेवेतील अधिकारी, वैज्ञानिक, अभियंते, विद्यार्थी यांचा सहभाग असतो.