जागतिक शौचालय दिन – हे आहे सर्वात महाग टॉयलेट

जगात कोणत्याही वस्तूबाबत सर्वात महागडी वस्तू काय अशी उत्सुकता अनेकाना असते. जगातील महागड्या गाड्या, इमारती, घरे, दागिने, घड्याळे, कलाकृती यांची नेहमी चर्चा होत असते. जगात महागडे टॉयलेट सुद्धा चर्चेत असते आणि बहुतेकांना हे महागडे शौचालय सोने हिऱ्याचे असणार असेच वाटते. पण सर्वात महाग टॉयलेट पृथ्वीवर नाही. तर ते आहे अंतराळात. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर. या टॉयलेट साठी १९ दशलक्ष डॉलर्स म्हणजे १ अब्ज ३६ कोटी ५८ लाख ७२ हजार रुपये खर्च केला गेला आहे. याच्या देखभालीचा खर्च सुद्धा फार मोठा आहे. आज ही चर्चा करण्याचे कारण म्हणजे आजची तारीख,१९ नोव्हेंबर.

१९ नोव्हेंबर हा जागतिक शौचालय दिवस म्हणून साजरा केला जातो. सिंगापूरच्या जॅक सिम याने १९ नोव्हेंबर २००१ मध्ये सर्वप्रथम वर्ल्ड टॉयलेट ऑरगनायझेशनची स्थापना केली होती. २०१३ मध्ये संयुक्त राष्ट्राने अधिकृत रित्या हा दिवस जागतिक शौचालय दिवस म्हणून जाहीर केला. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश उघड्यावर शौच करण्यापासून जागृती आणि शौचालयाचा वापर हा मानवाधिकार असून प्रत्येक व्यक्तीला तो मिळवा यासाठी प्रयत्न हा आहे.

आकडेवारी सांगते, भारतात आत्तापर्यंत १० कोटी शौचालये बांधली गेली आहेत. जगात ३.६ अब्ज नागरिकांना आजही योग्य शौचालयाने उपलब्ध नाहीत आणि ६ कोटी ७३ लाखाहून अधिक आजही उघड्यावर शौच करतात. दरवर्षी या दिवसाची खास थीम असते. यंदा म्हणजे २०२२ साठी ‘मेकिंग इनव्हिजीबल व्हिजिबल’ अशी थीम आहे.