म्हणून केली जाते नोर्को टेस्टची मागणी 

सध्या गाजत असलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला याची नार्को टेस्ट करण्याची परवानगी पोलिसांनी मागितली आहे. आफताब सत्य लपवतो आहे आणि खरे काय ते बाहेर यावे यासाठी या टेस्टची मागणी केली गेली आहे. काय असते ही नार्को टेस्ट? त्यातून सत्य खरेच उजेडात येते का असे प्रश्न अनेकांना पडतात. अर्थात अशी टेस्ट न्यायालयाने परवानगी दिली तरच करता येते. याला लाय डिटेक्टर टेस्ट असेही म्हटले जाते.

या टेस्ट मध्ये संबंधिताला सोडियम पेंटोथॅलचे इंजेक्शन दिले जाते. हे एक प्रकारचे रसायन आहे. या रसायनाचा शरीरावर वेगाने परिणाम होतो आणि माणूस खोटे बोलत असेल तर ते यात समजून येते. यात शरीरवर विविध जागी संवेदनशील इलेक्ट्रोड लावले जातात. त्यामुळे रक्तदाब, श्वास, नाडी गती, रक्तप्रवाह, घाम ग्रंथी मधील बदल समजतात. यात एकप्रकारे माणूस संमोहन स्थितीत जातो. त्यामुळे त्याची कल्पना शक्ती कमजोर होते आणि खोटे रचून सांगणे त्याला शक्य होत नाही. त्यामुळे तो जे सांगतो ते खरे असते असे मानले जाते. या रसायनाला ‘ट्रूथ सिरप’ असेही म्हटले जाते. काही वेळा शस्त्रक्रिया करताना गुंगीचे औषध म्हणून सुद्धा याचा वापर केला जातो.

भारतात गुन्ह्यांची उकल करण्यासाठी मदत म्हणून अनेकदा नार्को टेस्टचा वापर केला जातो. त्याला कायद्याने मान्यता आहे मात्र या टेस्ट मध्ये आरोपी जे सांगेल ते सर्व खरे आहे असे मात्र कायदा मानत नाही. म्हणजे पुरावा म्हणून हि कबुली ग्राह्य ठरेलच असे नाही. शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिच्यावर २०१७ मध्ये अशी नार्को टेस्ट केली गेली होती.