फिक्सिंगच्या आरोपात फिफा वर्ल्ड कप, दिली जाणार साडेसहा हजार कोटींची बक्षिसे

मध्यपूर्वेतील कतार देशात रविवारपासून सुरु होत असलेल्या फिफा वर्ल्ड कपला फिक्सिंगचे ग्रहण लागल्याचा आरोप केला जात आहे. सर्वाधिक बक्षीस रक्कम देणाऱ्या स्पर्धेत तीन नंबरवर असलेल्या फिफा वर्ल्ड कप साठी यंदा  साडेसहा हजार कोटींची बक्षिसे दिली जाणार आहेत. पैकी विजेत्याला ३५९ कोटी, उपविजेत्याला २४५ कोटी, तीन व चार नंबरच्या टीमना अनुक्रमे २२० व २०४ कोटी तर या वर्ल्ड कप मध्ये सहभागी असलेल्या व गुणतालिकेत ३२ म्हणजे शेवटच्या क्रमांकावर येणाऱ्या टीमला सुद्धा ७३ कोटी रुपये मिळणार आहेत.

स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच ब्रिटीश मिडलइस्ट सेंटर फॉर स्टडिज अँड रिसर्चचे प्रादेशिक संचालक अहमद तहयंजे यांनी या स्पर्धेत यजमान कतारने फिक्सिंग केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पहिल्याच फेरीत कतार आणि इक़्वाडोर यांच्यात सामना होणार आहे. त्यात इक्वाडोरने सामना हरावा म्हणून त्यांच्या आठ खेळाडूना ७.४ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ६० कोटींची लाच दिली गेली आहे. त्यानुसार हा सामना १-० ने कतार जिंकेल आणि हा एकमेव गोल दुसऱ्या हाफ मध्ये नोंदविला जाईल.

जगातील सर्वात मोठी बक्षीस रक्कम असलेली स्पर्धा युईएफए फुटबॉल चँपियनशिप लीग असून त्यात १०.६ हजार कोटींची बक्षिसे दिली जातात. दुसरा नंबर फॉर्म्युला वन मोटार स्पोर्ट्स असून त्यात ६.५ हजार कोटींची बक्षिसे दिली जातात. तीन नंबरवर फिफा वर्ल्ड कप आहे. आयपीएल मध्ये बक्षिसाची रक्कम एकूण ४६.५ कोटी असून फिफाची रक्कम या तुलनेत सातपट अधिक आहे.