चार हजार वस्तीच्या या गावात १ हजार युट्यूबर

भारत हा खेड्यांचा देश आहे. देशात लाखो खेडी आहेत आणि अनेक खेड्यांची काही खास विशिष्टे सुद्धा आहेत. आजही अनेक गावात मोबाईल नेटवर्क नाही हे खरे असले तरी छत्तीसगड मधल्या एका गावाने डिजिटल क्षेत्रात क्रांती केली आहे. तुलसी या गावाची लोकसंख्या आहे ४ हजार. पण येथे सुमारे १ हजार युट्यूबर आहेत. पाच ते पंच्याऐशी वयाचे अनेक नागरिक येथे युटयूबर बनले असून त्यातून मोठी कमाई करत आहेत.

गावातील गल्ल्या, शेतात रोज कुठले ना कुठले व्हिडीओ शुटींग सुरु असते आणि गावातील लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सर्व त्यात उत्साहाने सहभागी होत असतात. मग तरुणाईचे तर विचारायला नकोच. यातून कमाईचा एक चांगला मार्ग गावाला मिळाला आहे. दूरदूरच्या गावातील नागरिक या गावाला भेट देण्यासाठी आवर्जून येतात. रायपुरपासून ४५ किमीवर हे गाव आहे. येथे युटयूबवर अनेक चॅनल्स बनविले गेले आहेत.

याचे सारे श्रेय जय वर्मा आणि त्याचा मित्र ज्ञानेंद्र यांना जाते. जयने २०१६ मध्ये युट्यूब व्हिडीओ बनवायला सुरवात केली. त्यापूर्वी तो कोचिंग क्लास घेत असे. त्याने मित्र ज्ञानेंद्र याच्यासोबत कॉमेडी व्हिडीओ बनवायला सुरवात केली आणि गाववाल्यांनी त्यांना पाठींबा दिला. व्हीडीओ मध्ये लहान थोर सर्व अभिनय करतात. प्रसिद्धी मिळाली तशी युट्यूब चॅनल मधून कमाई सुरु झाली. पूर्वी मोबाईलवर व्हीडीओ शूट व्हायचे आता कॅमेरे आले. दिवसभर शेतात काम केले कि सायंकाळी विविध विषयावर व्हिडीओ चित्रित केले जातात.

ज्ञानेंद्र इजिनिअर आहे. व्हिडीओची तांत्रिक बाजू तो सांभाळतो. सध्या या गावाचे ३५ ते ४० युटयूब चॅनल आहेत. अनेक व्हिडीओ स्थानिक भाषेतून बनविले जातात आणि प्रत्येकात काही संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो.