रोनाल्डो, मेस्सी नव्हे तर हा आहे सर्वाधिक श्रीमंत फुटबॉलर

आता फिफा वर्ल्ड कप सुरु होत आहे. कोणता फुटबॉलर किती कमाई करतो, कुणाची संपत्ती किती याच्या चर्चा पुन्हा नव्याने सुरु होतील. जगातील धनाढ्य फुटबॉलर म्हटले कि चटकन आर्जेन्टिनाचा लियोनेल मेस्सी आणि पोर्तुगालचा ख्रीस्तीयानो रोनाल्डो यांचीच नावे घेतली जातात. २०२२ च्या आकडेवारी नुसार मेस्सीची संपत्ती ६०० दशलक्ष डॉलर्स म्हणजे ४९०० कोटी तर रोनाल्डोची संपत्ती ५०० दशलक्ष डॉलर्स म्हणजे ४ हजार कोटी रुपये आहे. पण हे दोघे सर्वात श्रीमंत फुटबॉलर नाहीत. सर्वात श्रीमंत फुटबॉलरचे नाव फारसे कुणाला परिचित नाही. पण हा मान २४ वर्षीय एका फुटबॉलरकडे आहे.

या मिडफिल्डर खेळाडूचे नाव आहे फैक बोल्किया. तो सध्या थायलंडच्या चोनबुरी क्लबसाठी खेळतो. त्याची एकूण संपत्ती आहे २० अब्ज डॉलर्स. म्हणजे १६०० खर्व रुपये. १ बिलियन डॉलर्स म्हणजे एकावर १० शून्ये दिल्यावर होणारे रुपये. फैक शाही परिवारातील आहे. ब्रुनेईचा सध्याचा सुलतान हसनल बोल्किया याचा हा पुतण्या. त्याच्या वडिलांचे नाव आहे राजकुमार जेफरी बोल्किया. फैक ब्रुनेई राष्ट्रीय फुटबॉल टीमचा कप्तान होता. त्याचा जन्म लॉस एंजेलिस मध्ये झाला त्यामुळे त्याच्याकडे ब्रुनेई आणि अमेरिकेचे नागरिकत्व आहे.

फैकचे शिक्षण ब्रिटन मध्ये झाले आहे. जेव्हा तो अमेरिकेकडून फुटबॉल खेळण्यासाठी योग्य झाला तेव्हाच त्याने ब्रुनेई कडून खेळण्याचा निर्णय घेतला. चेल्सी, आर्सेनल, सौथंप्टन, लीस्टेस्टर सिटी क्लबच्या रोलवर तो होता. चोनबुरी कडून तो २०२१ पासून खेळत असून थाई टीम मध्ये असलेला तो एकमेव, पहिला ब्रुनेईचा फुटबॉलर आहे.