चंद्रावरच्या मातीचा व्यापार होतोय सुरु

चंद्रावरील सामग्रीचा खासगी व्यापार सुरु होण्याचा दिवस आता फार दूर राहिलेला नाही याचे संकेत मिळू लागले आहेत. जपानची आयस्पेस ही खासगी कंपनी चंद्रावरील माती आणि धूळ पृथ्वीवर आणणार आहे आणि अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा ही माती विकत घेणार आहे. अंतराळातील सामग्री खासगी कंपनीने आणून त्याचा व्यापार करण्याची ही पहिलीच व्यावसायिक देवघेव असेल असे सांगितले जात आहे.

नासाने चंद्रमोहीम आर्टिमिस योजनेची घोषणा केली तेव्हापासूनचा चंद्रावरील उत्खनन चर्चा सुरु झाली आहे. चंद्रावर लिथियम मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अनेक देशांना चंद्रावर जाण्याची प्रेरणा मिळाली आहे. चंद्रावरील उत्खनन संदर्भात आंतरराष्ट्रीय कायदा बनविला जात आहे असेही समजते.

जपानची आयस्पेस ही खासगी कंपनी नासा बरोबर करणार असलेला हा व्यापार म्हणजे या क्षेत्रात खासगी क्षेत्रात खासगी क्षेत्राचा प्रवेश आहे. आजपर्यंत सरकारी संस्थाच अश्या प्रकारे अंतराळातील सामग्रीची देवघेव करू शकत होत्या. चंद्रावरील माती किंवा धूळ खूप महाग असून एका पाउच साठी ५ हजार डॉलर्स आकारले जातात. आयस्पेस ही जपान मधील वैश्विक चंद्र शोध कंपनी असून तिला तसा परवाना मिळाला आहे. या कंपनीचे हे पहिले अभियान आहे.

जपानचे अंतराळ विभाग राज्यमंत्री तकाइची यांनी या संदर्भात एक पत्रकार परिषद घेतली. त्यात दिलेल्या माहितीनुसार स्पेस एक्सच्या फाल्कन ९ रॉकेटच्या मदतीने २२ नोव्हेंबर रोजी हकुतो आर कार्यक्रमात हे पहिले प्रक्षेपण होऊ शकेल. आयस्पेस त्याच्या लँडरच्या पायाभोवतीची माती गोळा करणार आहे आणि नासा ही माती खरेदी करणार आहे. वास्तविक नासा स्वतः हे काम करू शकते पण त्यांना अंतराळात आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवायचा आहे. परिणामी भविष्य काळात अनेक देशात अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप सुरु होतील असा अंदाज वर्तविला जात आहे.