सौदी व्हिसा साठी भारतीयांना पोलीस व्हेरिफिकेशनची गरज संपली

आखाडी देशात नोकरी व्यावसायानिमित्ताने मोठ्या संखेने जाणाऱ्या भारतीयासाठी सौदी अरेबियाने महत्वाची घोषणा केली आहे. या पुढे भारतीयांना सौदीचा व्हिसा मिळविण्यासाठी पोलीस व्हेरिफिकेशन करावे लागणार नाही. ही घोषणा गुरुवारी दिल्ली मधील सौदी दुतावासाने केली असून त्याची महिती सोशल मिडियावर दिली आहे. त्यानुसार भारत आणि सौदी या दोन देशातील संबंध अधिक मजबूत होण्यासाठी, सौदीला जाण्याचा व्हिसा अर्ज करण्यासाठी पोलीस व्हेरिफिकेशन म्हणजे पीसीसीची गरज यापुढे भासणार नाही. किंग्डम ऑफ सौदीच्या रॉयल एम्बसी कडून सुद्धा या संदर्भात एक पत्रक जारी केले गेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २०१९ मध्येच सौदी आणि भारत यांच्यात याविषयी चर्चा सुरु झाली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदी सौदी भेटीवर गेले होते. त्यानंतर परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि सौदी परराष्ट्र मंत्र्यांच्या मध्ये पुढील बोलणी सुरु झाली होती. पण करोना उद्रेकामुळे ही बोलणी पुढे सरकू शकली नव्हती. पण त्यावेळी सौदीने भारतीयांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असा शब्द दिला होता. करोना काळात सौदीला भारताने करोना लस पुरविली होती. त्याबद्दल सौदी प्रिन्स मोहम्मद बिन सलमानने भारताचे पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद दिले होते. सौदी पर्यटन मंत्रालयाने १ ऑगस्ट २०२१ पासून व्हिजा होल्डरना देशात परत येण्यास मंजुरी दिली होती.

नोकरी व्यवसाय निमित्ताने सुमारे ३५ लाख भारतीय युएई मध्ये आहेत तर सौदी मध्ये ३० लाख भारतीय आहेत. याशिवाय दरवर्षी हज यात्रेसाठी भारतातून हजारो बांधव जात असतात. या सर्वाना वरील नव्या नियमाचा लाभ मिळणार आहे.