थोडे पैसे खर्च करा आणि राजमहालात राहण्याचा आनंद घ्या

राजे महाराजे अलिशान महालातून राहतात ही शान काही वेगळीच असणार अशी आपली कल्पना असते. आपण कधी काळी अश्या राजमहालात राहू शकू का असाही प्रश्न काही लोकांच्या मनात येत असेल. व्हिएतनाम मध्ये जाण्याची संधी असेल तर हे सुख तुम्ही थोडे पैसे खर्च करून अनुभवू शकता. व्हिएतनाम तसाही पर्यटकांचा आवडता देश आहेच. तेव्हा या देशाची सुंदर राजधानी हनोई मध्ये ही चैन तुम्ही करू शकणार आहात.

सध्या येथील एक फाईव्ह स्टार हॉटेल फारच चर्चेत आले आहे. या हॉटेलचे इंटिरीयर अस्सल सोन्यापासून बनविले गेले आहे. बार, लाउंज पासून सिंक, टॉयलेट, दरवाजे खिडक्यांच्या फ्रेम सोन्याच्या बनविल्या गेल्या आहेत. त्यामुळे येथे वास्तव्य म्हणजे राजेशाही पाहुणचार असे नक्कीच म्हणता येईल. हे हॉटेल त्याचे बांधकाम सुरु झाल्यापासूनच चर्चेत आहे.

वेबसाईट डेलीस्टारच्या रिपोर्ट नुसार रेस्टॉरंट, फिटनेस सेंटर, बार, लाउंज, बिझिनेस सेंटर अश्या अत्याधुनिक सुविधा येथे आहेत. शिवाय रूम्स चे दरवाजे , खिडक्या फ्रेम्स, टॉयलेट, बाथटब, दिवे, भिंती सोन्याने मढविल्या गेल्या आहेत. ‘ डोल्स बाय व्हँडम हनोई गोल्डन लेक’ असे हा हॉटेलचे नाव आहे. या हॉटेल मधून हनोईचे पूर्ण सौंदर्य पाहता येते. येथे तुम्ही ९ हजार रुपये भरून खोली बुक करू शकता. येथील स्टाफ इंग्रजी सह सहा भाषा बोलू शकतो आणि येथील सेवा उत्तम प्रतीची आहे असे म्हणतात.