२० कोटींना घेतलेल्या इवाना ट्रम्प यांच्या बंगल्यासाठी मोजावे लागणार २१५ कोटी

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घटस्फोटीत पत्नी इवाना यांचे मॅनहटन येथील घर विक्रीसाठी आले असून त्याची किंमत २१५ कोटी रूपये सांगितली जात आहे. हा बंगला विकून येणारी रक्कम त्यांची तीन मुले डोनाल्ड ज्युनियर, इव्हांका आणि एरिक यांच्यात वाटून दिली जाणार आहे. ६४ स्ट्रीट वर असलेला हा बंगला ८७२५ चौरस फुट जागेत बांधला गेला असून त्यात पाच बेडरूम, पाच बाथरूम्स आहेत.

१९८० मध्ये या बंगल्याची अंतर्गत सजावट केली गेली आहे. १९९२ मध्ये इवाना यांनी हा बंगला २० कोटी रूपयात खरेदी केला होता. याच वर्षी त्यांचा डोनाल्ड यांच्या बरोबर घटस्फोट झाला होता. जुलै २०२२ मध्ये याच घरात इवाना यांचा अपघाती मृत्यू झाला. घरातील जिन्यावरून पडल्याने त्या जखमी झाल्या होत्या आणि त्यातच त्यांचे निधन झाले होते.

मुळच्या चेकोस्लोवाकियाच्या असलेल्या इवाना शिक्षणासाठी अमेरिकेत आल्या होत्या. त्या मॉडेलिंग करत असत. डोनाल्ड व्यावसायिक होते आणि या दोघांची ओळख १९७६ मध्ये झाली व त्यांनी १९७७ मध्ये विवाह केला होता. हा विवाह १५ वर्षे टिकला. वादग्रस्त विधाने करण्यावरून इवाना नेहमीच चर्चेत असत. डोनाल्ड आणि ईवाना यांची जोडी अमेरिकेतील सर्वात हाय प्रोफाईल जोडप्यातील एक मानली जात असे.