फिफा २०२२, या फुटबॉलपटूंसाठी अखेरचा ?

जगातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव फिफा वर्ल्ड कप पुढील रविवार पासून सुरु होत असून यात ३२ संघ सहभागी होणार आहेत. २९ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ६४ सामने खेळले जाणार आहेत. हा वर्ल्ड कप अनेक कारणांनी खास आहे. मुख्य म्हणजे प्रथमच मध्य पूर्वेतील देशात म्हणजे कतार मध्ये त्याचे आयोजन केले गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनेक दिग्गज खेळाडूंसाठी हा शेवटचा वर्ल्ड कप ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे महान खेळाडू आपल्या देशाला हा कप मिळवा यासाठी अटीतटीने खेळणार यात शंका नाही.

लियोनेल मेस्सी हा आर्जेन्टिनाचा चार वर्ल्ड कप खेळलेला खेळाडू या कप नंतर पुन्हा वर्ल्ड कप मध्ये दिसणार नाही असे म्हटले जात आहे. मेस्सी ३४ वर्षांचा आहे आणि त्याने फिफा वर्ल्ड कप मध्ये आत्तापर्यंत ६ गोल केले आहेत. २०१४ मध्ये त्याला गोल्डन बॉल अॅवॉर्ड मिळाले होते.

दुसरा दिग्गज खेळाडू म्हणजे क्रिस्तियानो रोनाल्डो. पोर्तुगालचा हा महान कप्तान ३७ वर्षांचा झाला आहे आणि त्याने १७ सामन्यात ७ गोल केले आहेत. २००६ मध्ये पोर्तुगाल फिफा वर्ल्ड कप मध्ये चौथ्या क्रमांकावर होते आणि तीच या देशाची सर्वोच्च कामगिरी आहे.

नेमार २०१४ मध्ये पहिला फिफा वर्ल्ड कप खेळला. ब्राझीलचा हा सुपरस्टार ३० वर्षांचा आहे. एका मुलाखतीत त्याने कतर येथील फिफा वर्ल्ड कप त्यांच्यासाठी शेवटचा असेल असे सांगितले आहे. रोबर्ट लेवनडोस्की या पोलंडच्या खेळाडूचा हा दुसरा वर्ल्ड कप आहे. तो ३४ वर्षांचा असून गेल्या वर्ल्ड कप मध्ये त्याला एकही गोल नोंदविता आला नव्हता. लुईस सुव्रेज हा उरुग्वेचा खेळाडू ३५ वर्षाचा आहे. त्याने तीन वर्ल्ड कप खेळले असून १३ सामन्यात ७ गोल केले आहेत. त्याने प्लेअर ऑफ द मॅच अॅवॉर्ड मिळविले आहे.