चोरी साठी चोर अशी निवडतात घरे

घरफोड्या हा जगात सर्वठिकाणी होणारा प्रकार. घरफोडी झाली नाही असे एखादे गाव सुद्धा सापडणार नाही. चोर कुठल्या घरात डल्ला मारायचा हे कसे ठरवितात असा प्रश्न अनेकांना पडत असेल. हाच प्रश्न संशोधकांच्या मनात सुद्धा येत असणार. त्यामुळेच जगातील या प्रकारचे पहिले संशोधन किंवा अभ्यास बेल्जियमच्या घेन्त विद्यापीठाचे प्रोफेसर कुरालार्सन आणि मद्रास विद्यापीठाच्या डॉ. प्रियंवदा यांनी केला असून त्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

प्रत्येकाचे घराचे जसे काही स्वप्न असते तसेच घराच्या दरवाज्यावर आकर्षक नेमप्लेट लावण्यास सुद्धा महत्व दिले जाते. वरील दोघा संशोधकांनी केलेल्या संशोधनात आकर्षक नेमप्लेट चोरांचे लक्ष वेधून घेण्यात महत्वाच्या ठरतात. चांगली घरे, आकर्षक नेमप्लेट, दारात उभ्या असलेल्या महागड्या गाड्या, सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही या साऱ्याची नोंद चोर घरफोडी करण्यासाठी घेतात आणि मग सणवार, विवाह समारंभ असे योग साधून घरफोड्या करतात. कारण या दिवसात रोकड आणि दागदागिने घरात आणून ठेवले जात असतात. प्रियंवदा आणि कुरालार्सन यांनी ३१४ चोरावर असा अभ्यास करून ३०० पानी रिपोर्ट सादर केला आहे.

यानुसार ६३ टक्के चोरऱ्या नेमप्लेटवर लिहिलेले प्रोफेशन वाचून होतात, ७० टक्के घरफोड्या चोर त्यांच्याच घराच्या परिसरात करतात कारण तेथील गल्ली बोळ, रस्त्यांची त्यांना चांगली माहिती असते, ७२ टक्के घरफोड्या दारातील गाड्या पाहून होतात. ९७ टक्के चोर घरफोडीसाठी अनेक दारे किंवा बाहेर जाण्याचे मार्ग असलेली घरे निवडतात. गल्लीबोळातील घरे किंवा रस्ता जेथे संपतो म्हणजे डेडएंड असलेली घरे चोर टाळतात.

चोर चोऱ्या करताना पोलीस गस्तीच्या वेळा लक्षात घेतात, चोरी नंतर पकडले जाऊ नये म्हणून सार्वजनिक वाहनाचा वापर करतात, ज्यामुळे नाकाबंदी मधून त्यांची सुटका होते. घरासमोर वर्तमानपत्राचा ढीग असले, दुधाच्या पिशव्या पडलेल्या असतील तर घरात कुणी नाही हे अपोआप कळते. घराच्या मागच्या दारातून आत प्रवेश करण्यास चोरांची पसंती असते. कुत्री असतील तर त्यांना खायचे पदार्थ देण्याकडे चोरांचा कल असतो. कुलुपे तोडायला चोरांना फारतर १० सेकंद लागतात आणि घरात शिरताच ते प्रथम बेडरूम, देवघर आणि किचन मध्ये शोध घेतात. चोऱ्यांचे अॅडव्हांस तंत्र चोर तुरुंगातूनच शिकतात असेही या संशोधनात दिसून आले आहे.