सावरकरांबाबत राहुल यांच्या मताशी शिवसेना असहमत

मुंबई: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केलेल्या मताशी शिवसेना सहमत नाही, असे स्पष्ट करून शिवसेनेच्या एका गटाचे कार्यप्रमुख उध्दव ठाकरे यांनी, अद्याप सावरकरांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित का केले नाही, असा सवाल केंद्र शासनाला केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे स्फूर्तिस्थान आहेत. आमच्या मनात त्यांच्याबद्दल अतीव आदर आहे, असे ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

भारत जोडो यात्रेदरम्यान वाशिम येथे बोलताना राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर टीका केली होती. अंदमान येथे कारावासाची शिक्षा भोगत असताना सावरकरांनी दोन वर्षात इंग्रज सरकारला माफीपत्र लिहिण्यास सुरुवात केली. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांनी दीर्घकाळ कारावास भोगला. मात्र, त्यांनी कधी परकीय सरकारची माफी मागितली नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची दीर्घ काळाची युती तोडून शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर महाविकास आघाडी केली आहे. या निर्णयावरून शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांपासून फारकत घेतल्याची टीका शिवसेनेवर होत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी या आरोपाचा इनकार केला आहे.

ब्रिटिश सत्ता उलथवून मिळालेले स्वातंत्र्य कायम राहावे, यासाठी आपण काँग्रेसबरोबर आघाडी केली असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. या आघाडीबाबत शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपने काश्मीरमध्ये पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीबरोबर युती कशी केली, असा सवालही ठाकरे यांनी केला.