विवाह पंचमी शुभ, पण या दिवशी केले जात नाहीत विवाह

हिंदू धर्मात विवाह पंचमी हा उत्सव म्हणून साजरा होत असला तरी हा दिवस विवाहासाठी मात्र अशुभ मानला जातो. मार्गशीर्ष शुक्ल पंचमी म्हणजे विवाह पंचमी. यावर्षी ही तिथी २८ नोव्हेंबर रोजी आहे. याच दिवशी भगवान राम आणि माता सीता यांचा विवाह झाला होता. या दिवसाला पौराणिक मान्यता आहे आणि अनेक ठिकाणी हा दिवस उत्सव म्हणून साजरा होतो. या दिवशी राम सीतेचा विवाह समारंभ अनेक ठिकाणी केला जातो, राम सीतेचे पूजन केले जाते, अनेक ठिकाणी या दिवशी उपवास केला जातो. मात्र शक्यतो या दिवशी विवाहाचा मुहूर्त धरला जात नाही.

भगवान राम आणि माता सीता हे आदर्श जोडपे मानले जाते. नवविवाहितांना त्यांची जोडी राम सीते सारखी बनो असे आशीर्वाद सुद्धा दिले जातात. पण हा दिवस विवाहासाठी अशुभ मानला जातो त्याचे मुख्य कारण राम सीतेला भोगावा लागलेला १४ वर्षांचा वनवास मानला जातो.

राम सीता विवाह झाल्यानंतरच त्यांना १४ वर्षे वनवासात जावे लागले, तेथे अनेक हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या, सीतामाईचे रावणाने अपहरण केले, अयोध्येला परत आल्यावर सीतेने अग्नी परीक्षा दिली तरी रामाने सीतेचा त्याग केला आणि सीतामाईला आश्रमात आपल्या पुत्रांना जन्म द्यावा लागला आणि अखेरी धरणीच्या पोटात आश्रय घ्यावा. जनक राजाची मुलगी असूनही आणि अयोध्येची राणी असूनही सीतेला हा त्रास सोसावा लागला त्यामुळे विवाह पंचमी ही तिथी विवाह कार्यासाठी अशुभ मानली जाते आणि मुलीचे माता पिता या तिथीला मुलीचा विवाह करण्यास तयार होत नाहीत असे सांगतात.

या दिवशी उपवर कन्येने राम सीता पूजन केले तर तिला चांगला वर मिळतो असा समज आहे.