जेल प्रीमियर लीग बद्दल ऐकलेय?

इंडियन प्रीमियर लीग बद्दल क्रिकेटवेड्यांना वेगळे काही सांगायची गरज नाही, पण तुम्ही कधी जेल प्रीमियर लीग बद्दल ऐकले आहे का? गेली पाच वर्षे ही क्रिकेट टूर्नामेंट भरविली जात आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्हा कारागृह सध्या क्रिकेटचे मैदान बनले असून येथे ही जेपीएल म्हणजे जेल प्रीमियर लीग बुधवार पासून सुरु झाली आहे. त्यामुळे सध्या येथील बंदी क्रिकेट खेळणे, क्रिकेट विषयी चर्चा आणि सामन्यांच्या योजना यात मश्गुल आहेत.

जेल अधीक्षक राकेश कुमार सांगतात, गेली पाच वर्षे आम्ही जेपीएलचे आयोजन करत आहोत. यामागे बंदीवनांच्या मनात खेळ भावना जागृत करणे हा उद्देश आहे तसेच त्यांना क्रिकेट मधील रोमांच अनुभवता यावा असा हेतू आहे. मेरठची ओळख पूर्वीपासूनचा क्रीडा नगरी अशी आहे. येथे अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात आणि तोच आनंद कैद्यांना मिळावा असा आमचा हेतू आहे.

चौधरी चरणसिंग जिल्हा कारागृहात सुरु असलेल्या या जेपीएल मध्ये एकूण सात टीम असून प्रत्येक टीम मध्ये १५ खेळाडू आहेत. ते एकूण ४७ सामने खेळणार आहेत. त्यात तुरुंग स्टाफ आणि कर्मचारी नाहीत. या कारागृहात कवी संमेलन, भागवत पारायण, सुंदरकांड पाठ सुद्धा केले जातात. येथील बंदी शिक्षा भोगून बाहेर जातील तेव्हा त्यांच्या वर्तनात सुधार व्हावा आणि समाजात मिसळून जाण्यासाठी त्यांना मदत व्हावी यासाठी असे उपक्रम घेतले जातात असे समजते.