मोदी मॅजिक? सुनक यांनी दरवर्षी ३ हजार भारतीयांना व्हीसा देण्याची दिली परवानगी

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारतातील तरुणांना दरवर्षी ब्रिटन मध्ये काम करणे आणि निवासासाठी ३ हजार व्हिसा देण्याच्या योजनेला हिरवा कंदील दाखविला आहे. ब्रिटीश सरकारने ही घोषणा केली असून या योजनेचा लाभ मिळालेला भारत पहिला देश बनला आहे. विशेष म्हणजे जी २० परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे भारतवंशी पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट झाल्यावर काही तासात ही घोषणा १०, डाउनिंग स्ट्रीट मधून करण्यात आली आहे.

ब्रिटीश पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलेल्या घोषणेनुसार, आज युके,भारतातील तरुण प्रोफेशनल साठी सादर झालेल्या योजनेला मान्यता देत आहे. १८ ते ३० वयोगटातील शिक्षित भारतीय नागरिकांसाठी दरवर्षी तीन हजार व्हिसा दिले जाणार असून त्यात दोन वर्षे कामाची परवानगी दिली गेली आहे. जी २० शिखर परिषदेत, गेल्या महिन्यात ब्रिटनचे पंतप्रधान बनलेले सुनक आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांची पहिलीच भेट होती.

नव्या योजनेचा शुभारंभ भारताबरोबर द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याचा दिशेने टाकलेले महत्वाचे पाउल आहे. दोन्ही देशांची अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. युके मध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यात १/४ विद्यार्थी भारतीय आहेत. ब्रिटन बरोबर सध्या व्यापार समझोत्यावर सुद्धा चर्चा सुरु असून त्यात सहमती झाली तर भारताचा युरोपीय देशाबरोबर झालेला अश्या प्रकारचा पहिलाच सौदा असेल असे म्हटले जात आहे.