अॅपल आयफोनच्या सर्वात मोठ्या कारखान्यात काम करणार आदिवासी महिला

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी आदिवासी गौरव दिवस समारंभात बोलताना अॅपल कंपनीचा आयफोन निर्मितीचा सर्वात मोठा प्रकल्प भारतात बंगलोर जवळ होसूर येथे बांधला जात असल्याचे आणि या मुळे ६० हजार लोकांना रोजगार मिळणार असल्याचे सांगितले. वैष्णव म्हणाले, रांची आणि हजारीबाग येथील सुमारे ६ हजार आदिवासी महिलांना आयफोन कसे तयार करायचे याचे प्रशिक्षण दिले गेले असून त्यांना या नव्या कारखान्यात रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे.

आयफोन भारतात यापूर्वी पासून बनत आहेत. टाटा इलेक्ट्रोनिक्सला नव्या कारखाना उभारणीचा ठेका दिला गेला आहे. जगभर टेक कंपन्या कामगार कपात करत आहेत मात्र भारतात नवे रोजगार निर्माण होत आहेत. होसूर येथे टाटा इलेक्ट्रोनिकचा एक प्रकल्प आहेच. तेथेच नवा प्रकल्प उभारला जात आहे. फॉक्सकॉन, विस्ट्रॉन, पेगाट्रोन आयफोन बनवत आहेतच. भारतात तयार झालेल्या आयफोनची निर्यात एप्रिल नंतर पाच महिन्यात १ अब्ज डॉलर्स पार करून गेली आहे. युरोप आणि मध्यपूर्वेत भारतात तयार झालेल्या आयफोनची शिपमेंट मार्च २०२३ मध्ये २.३ अब्ज डॉलर्स पेक्षा अधिक असेल अशी अपेक्षा केली जात आहे.