लवकरच येतोय अक्षयकुमारचा नवा पासपोर्ट

बॉलीवूड खिलाडी अक्षयकुमार त्याच्या कॅनेडियन नागरिकत्वावरून अनेकदा ट्रोल झाला आहे. त्याच्या नव्या चित्रपट रिलीजच्या वेळी हा मुद्दा अनेकदा चर्चेत आणला जातो. नुकत्याच पार पडलेल्या एका समिट मध्ये अक्षय सहभागी झाला होता तेव्हा सुद्धा त्याला त्याच्या परदेशी पासपोर्टवरून प्रश्न विचारले गेले तेव्हा अतिशय मनमोकळे उत्तर देताना अक्षयने त्याचा नवा भारतीय पासपोर्ट लवकरच येत असल्याचे सांगितले.

अक्षय या वेळी म्हणाला,  भारतीयत्व तुम्ही कोणत्या देशाचे नागरिक यावर अवलंबून नसते. जेव्हा जेव्हा देश अथवा देशातील राज्ये संकटात आली तेव्हा तेव्हा शक्य ती सर्व मदत करून माझ्यावरची जबाबदारी मी पार पाडली आहे. एका प्रश्नकर्त्याने त्यावर अक्षयला विचारले,’ तुम्ही २०१९ मध्ये भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केल्याचे सांगितले होते मग आता २०२२ मध्ये काय परिस्थिती आहे?’

यावर उत्तर देताना अक्षय म्हणाला, २०१९ मध्ये मी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला हे खरे आहे. पण त्यानंतर करोनामुळे सर्व बंद होते. पण आता माझा नवा पासपोर्ट लवकरच येतोय. अक्षय देशातील सर्वाधिक कर भरणारा सेलेब्रिटी कलाकार आहे. त्याने वेळोवेळी मोठ मोठ्या रकमा मदत म्हणून दिल्या आहेत. अक्षयने अनेक वेळा कॅनडियन नागरिकत्व का घेतले याचेही उत्तर दिले आहे.

त्याच्या आयुष्यात एक अशी वेळ आली कि त्याचे चित्रपट एकापाठोपाठ एक फ्लॉप झाले. बॉलीवूड मध्ये आपले करियर होऊ शकत नाही असे मानून त्याने कॅनडाच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला. तेथे जाऊन काही व्यवसाय करावा असा त्याचा विचार होता. त्याला कॅनडाचे नागरिकत्व मिळाले आणि त्याचवेळी त्याचा पहिला चित्रपट सुपरहिट झाला आणि यशाची कमान चढत गेली. त्यानंतर त्याने येथेच राहून करियर करण्याचा निर्णय घेतला होता.