जगात ही मुलगी ठरली ८ अब्जावी नागरिक

१५ नोव्हेंबर रोजी जगातील आठ अब्जाव्या बालकाचा जन्म झाल्याचे जाहीर केले गेले असून फिलिपिन्स मध्ये जन्मलेली एक बालिका जगाची आठ अब्जावी नागरिक ठरली आहे. फिलिपिन्सची राजधानी मनिला येथील टोंडो भागात डॉ. जोन्स फॅबेला मेमोरियल हॉस्पिटल मध्ये स्थानिक वेळ १.२९ मिनिटांनी तिचा जन्म झाला. तिचे नाव विनीस माबनसॅग असे असून विनीसच्या जन्माचा सोहळा फिलिपिन्सच्या जनसंख्या विकास आयोगाने मोठ्या धामधुमित साजरा केला. विनीस यामुळे सेलेब्रिटी ठरली असून तिचा तिच्या आईसोबतचा फोटो फेसबुकवर शेअर केला गेला आहे.

या फोटो खाली लिहिल्या गेलेल्या पोस्ट मध्ये जनसंख्या विकास आयोगाने ‘ जागतिक लोकसंख्येने आणखी एक मैलाचा दगड पार केल्याचे म्हटले आहे. जगातील आठ अब्जावी नागरिक १५ नोव्हेंबर रोजी जन्माला आली असून तिच्या जन्मानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने जगाची लोकसंख्या आठ अब्जावर पोहोचल्याचे जाहीर केले आहे.’ असे म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने’ फक्त लोकसंख्या पाहून नका तर आपली पृथ्वी अधिक सुंदर बनविण्याची आपली जबाबदारी वाढली आहे याचे भान असू द्यावे’ असे म्हटले आहे.

युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडाने,’ आठ अजब उमेदी, आठ अजब शक्यता. आमचा ग्रह ८ अब्ज लोकांचे घर’ असे ट्वीट केले आहे. विशेष म्हणजे जगाची लोकसंख्या गेल्या १२ वर्षात १ अब्जाने वाढली आहे. पुढील वर्षात नवीन बालक जन्मामध्ये भारत चीनला मागे टाकेल असे सांगितले जात आहे.