स्टीव जॉब्सच्या जुन्या सँडल्सची लिलावात १ कोटी ७७ लाखाला विक्री

आपल्या कॅलिफोर्निया येथील ज्या घरात स्टीव्ह जॉब्सने त्याचा मित्र स्टीव्ह वोज्रीयाक यांच्या सहभागाने आज जगप्रसिद्ध झालेल्या अॅपल इंकची स्थापना केली ते घर आज ऐतिहासिक वारसा म्हणून घोषित झाले असल्याचे अनेकांना माहिती आहे. मात्र याच घरात राहत असताना स्टीव्ह जॉब्सने दीर्घकाळ ज्या सँडल्सचा वापर केला ते जुने सँडल्स लिलावात विकले गेले असून त्याला चक्क २ लाख २० हजार डॉलर्स म्हणजे १ कोटी ७७ लाख रुपये किंमत मिळाली आहे. ज्युलियन ऑक्शन कंपनीने हा लिलाव केला. त्यांना या सँडल्ससाठी ६६ हजार डॉलर्स मिळावेत अशी अपेक्षा होती प्रत्यक्षात त्यांना तिपटीपेक्षा अधिक किंमत मिळाली आहे.

१९७० च्या दशकाच्या मध्यात स्टीव कॅलिफोर्निया मधील या घरात राहत होता आणि त्यावेळी त्याने हे सँडल्स दीर्घकाळ वापरले होते. ब्राऊन कलरच्या या सँडल्सला मिळालेल्या विक्रमी किंमतीने ते जगातील सर्वाधिक किंमत मिळालेली सँडल्स जोडी म्हणून रेकॉर्ड केले आहे. वेबसाईट लिस्टिंगनुसार या सँडलच्या तळव्याच्या वरचा भाग कॉर्क आणि ज्यूटपासून बनविला गेला आहे. दीर्घ काळाच्या वापरामुळे स्टीव्ह च्या पायाचे ठसे त्यावर उमटले आहेत. सँडल्स साठी इतकी मोठी बोली लावलेल्या ग्राहकांचे नाव गुप्त ठेवले गेले आहे.

१९७६ मध्ये या दोन्ही स्टीव्ह मित्रांनी कॅलिफोर्नियातील लॉस अल्टोस या स्टीव्ह जॉब्सच्या आईवडिलांचा घरात अॅपल ची स्थापना केली होती. २०१३ मध्ये हे घर हिस्टॉरिकाल कमिशनने ऐतिहासिक वारसा म्हणून जाहीर केले. मात्र त्यापूर्वीच २०११ मध्ये स्टीव्ह जॉब्सचे कॅन्सर मुळे निधन झाले होते. त्याला भारतीय अध्यात्माची ओढ होती आणि निम करौली बाबा यांचा तो निस्सीम भक्त होता.