वाऱ्याने हलणारी जगातील सर्वात सडपातळ गगनचुंबी इमारत

थिनेस्ट स्कायस्क्रॅपर म्हणजे जगातील सर्वात सडपातळ, गगनचुंबी इमारत अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या मॅनहटन बेटावर उभी असून ही इमारत वादळी वारे वाहू लागले तर हलते पण आतील रहिवाशांना मात्र इमारत हलतेय याची किंचितशी जाणीव सुद्धा होत नाही. स्टॅनवे टॉवर असे या इमारतीचे नाव असून तिची उंची आहे १४२८ फूट. ८४ मजल्यांच्या या इमारतीचे उंची आणि रुंदीचे प्रमाण २४ :१ असे आहे.

गार्डियनच्या रिपोर्टनुसार या हायराईज टॉवरच्या उभारणीत जगातील सर्वात मजबूत कॉंक्रीटचा वापर केला गेला आहे. काही वर्षांपूर्वी इंजिनीअर रोवन विलियम्स यांनीच १ हजार फुट उंचीचा टॉवर ताशी १०० मैल वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यात हलू शकतो असे मान्य केले होते मात्र इमारतीतील लोकांना त्याची जाणीव होणार नाही असे म्हटले होते. या इमारती मध्ये एकूण ६० अपार्टमेंट आहेत. सीएनएनच्या रिपोर्टनुसार या अपार्टमेंटसच्या किंमती ७.७५ मिलियन ते ६६ मिलीयन डॉलर्स म्हणजे ५८ कोटी ते ३३० कोटी या दरम्यान आहेत. पेंट हाउसेस अब्जावधी किमतीची आहेत.

वेस्ट, ५७ स्ट्रीट असा या इमारतीचा पत्ता आहे. सुरवातीला हा स्टॅनले हॉल म्हणून डिझाईन केला गेला होता मात्र नंतर १५ हजार कोटी रुपये खर्च करून येथे ही रहिवासी इमारत बांधली गेली. न्यूयॉर्कच्या आर्किटेक्चर फर्म एसओओपीने याचे डिझाईन केले असून तीन कंपन्या मिळून ही इमारत बांधली गेली आहे. इमारतीचे काम पूर्ण व्हायला ९ वर्षे लागली. सध्या ही इमारत तिच्या खास बांधकाम किंवा सडपातळपणासाठी नाही तर अन्य एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. ही इमारत म्हणजे विज्ञानाचा चमत्कार म्हटले जात आहे.

सध्या थंडी सुरु झाली असून या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर बर्फ जमते आहे. थोडे ऊन वाढले कि हे बर्फ वितळायला लागते आणि त्याचे मोठ मोठे तुकडे खाली रस्त्यावर कोसळतात. त्यात अनेक माणसे जखमी होतात. अनेक गाड्यांचे त्यामुळे नुकसान झाले आहे असेही समजते.