टॅटू हवा असेल तर सरकारी नोकरीवर सोडा पाणी

आजकाल शरीराच्या कुठल्याही भागांवर टॅटयू म्हणजे ग्रामीण भाषेत गोंदण काढून घेण्याची क्रेझ तरुणाई मध्ये आहे. याला तरुण मुले मुली अपवाद नाहीत. मात्र तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सरकारी नोकरी साठी तयारी करत असला तर टॅटू गोंदवून घेण्याअगोदर त्या संदर्भातले नियम जाणून घ्यायला विसरू नका.

एका व्यक्तीने उजव्या हाताच्या मागच्या भागावर टॅटू काढला होता पण त्याला सरकारी नोकर भरती नाकारली गेली तेव्हा त्याने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. पण दिल्ली हायकोर्टाने त्याच्या विरुद्ध निकाल दिला कारण उजवा हात हा सलामीसाठी वापरला जातो आणि गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार असा धार्मिक टॅटू सरकारी नोकरीत स्वीकारार्ह नाही हा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला. टॅटू संदर्भातील नवीन नियमानुसार शरीराच्या कुठल्याही दर्शनी भागावर, सहज दिसेल असा टॅटू गोंदवला असेल तर आयएएस, आयपीएस, आयआरएस, आयएफएस, इंडियन आर्मी, वायुसेना, नौसेना, तटरक्षक पोलीस दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राष्ट्रीय तपास यंत्रणा वा अन्य दलात भरती साठी उमेदवार अयोग्य ठरतो.

त्यामुळे वरील प्रकारच्या सरकारी नोकरीचा विचार मनात असेल तर शरीरावर टॅटू काढून घेताना नक्कीच विचार करा.  आदिवासी क्षेत्रातील रहिवासी किंवा आदिवासी समुदाय यांना मात्र या नियमातून वगळले गेले आहे.