अमेझोन मध्ये १० हजार कर्मचारी गमावणार नोकरी

ई कॉमर्स सेक्टर मधील बलाढ्य कंपनी अमेझोन मधून किमान १० हजार कर्मचार्यांना कामावरून कमी केले जाणार आहे. पुढच्या काही दिवसातच ही नोकर कपात सुरु होणार आहे. गेल्या काही तिमाहीत कंपनीला फायदा झालेला नाही आणि आर्थिक मंदी वाढत चालल्याने कंपनीला खर्चांवर नियंत्रण ठेवणे भाग पडत असल्याने ही नोकर कपात केली जात असल्याचे समजते. कंपनीने नवीन भरती बंद केली आहेच पण अनेक कर्मचाऱ्याना दुसरीकडे नोकरी बघा असेही बजावले असल्याचे समजते.

अमेझोनच्या आजपर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात मोठी नोकर कपात आहे. ३१ डिसेंबर २०२१ च्या आकडेवारी नुसार कंपनीत १६ लाख पूर्ण वेळ आणि अर्धवेळ कर्मचारी होते. त्यातील १० हजारांना एकदम कामावरून कमी केले जाणार आहे. म्हणजे हे प्रमाण १ टक्का आहे. कंपनीच्या अनेक विभागात रोबोंचा वापर वाढविला गेला आहे. डिलिव्हरीच्या एकूण कामातील ३/४ कामे रोबोटिक सिस्टीमचा वापर करून केली जात आहेत.

रोबोटिक्स प्रमुख टाई बार्डी म्हणाले पुढील पाच वर्षात पॅकेजिंग साठी १०० टक्के रोबोंचा वापर केला जाणार आहे. अर्थात माणसांची गरज राहणार आहे पण ते प्रमाण कमी असेल. मेटा, मायक्रोसोफ्ट आणि ट्विटर मागोमाग अमेझोनची नोकरकपात घोषणा झाली आहे.