ब्रिटनच्या कानाकोपऱ्यात पसरले आहेत पुतीन यांचे गुप्तहेर

युक्रेनवरील रशिया हल्ल्यानंतर अमेरिका आणि ब्रिटन या देशांनी रशियावर अनेक प्रतिबंध लागू केले आणि रशियाला अन्य जगापासून तोडण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला असताना ब्रिटन सरकारची चिंता वाढविणाऱ्या बातम्या येत आहेत. डेली स्टारच्या बातमीनुसार ब्रिटनमध्ये जागोजागी, अगदी ब्रिटनच्या कानाकोपऱ्यात रशियाचे गुप्तहेर कार्यरत आहेत. हे गुप्तहेर सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच राहत असून प्रत्येक क्षेत्रात त्यांचे अस्तित्व आहे. त्यामुळे पुतीन यांना ब्रिटन मध्ये चाललेल्या बारीकसारीक गोष्टींची अगदी खडानखडा माहिती मिळत आहे.

रशियन हेरांचे हे जाळे विद्यार्थी, कॅब चालक, राजकीय नेते, सिविल सेवा कर्मचारी, पोलीस, वेटर असे सर्व थरात पसरले गेले असून त्यांच्यावर एसव्हीआर या रशियन गुप्तचर संस्थेचे पूर्ण नियंत्रण आहे. ब्रिटन सरकारमध्ये वरपर्यंत या हेरांची पोहोच आहे आणि त्यामुळे ब्रिटन सरकार पुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. ब्रिटन मध्ये सध्या सुमारे ७३ हजार रशियन आहेत आणि त्यातीलच काही हेरगिरी करत आहेत. अन्य काही देशांचे नागरिक सुद्धा रशियासाठी हेरगिरी करत असल्याचे सांगितले जात आहे.

शुक्रवारी जर्मनीच्या ब्रिटीश दूतावासात डेव्हिड स्मिथ नावाच्या गार्डला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर रशियाला माहिती पुरवत असल्याचा आरोप आहे. ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लीज ट्रस यांचा मोबाईल सुद्धा रशियन हॅकर्सनी हॅक केला होता.