जगातील सर्वाधिक उंचीवरील मतदान केंद्रात १०० टक्के मतदान, झाले रेकॉर्ड

हिमाचल मध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा मतदानात जगातील सर्वाधिक उंचीवरच्या टशीगंग मतदान केंद्राने नवे रेकॉर्ड नोंदविले आहे. समुद्रसपाटी पासून १५२५६ फुट उंचीवर असलेल्या या मतदान केंद्रात १०० टक्के मतदान झाले. लाहौल स्पिती भागातील हे मतदान केंद्र पारंपारिक पद्धतीने सजविले गेले होते आणि मतदान सुरु झाल्यापासून येथे उत्साहाचे वातावरण होते. रस्त्यात बर्फाचे डोंगर असूनही येथील एकूण ५२ मतदारांनी पारंपारिक वेशभूषेत येऊन मतदान केले. त्यात ३० पुरुष आणि २२ महिला होत्या. विशेष म्हणजे मतदानाची वेळ संपण्यापूर्वीच एक तास येथे १०० टक्के मतदान नोंदले गेले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी अभिषेक वर्मा म्हणाले, येथे मतदारांचे परंपरागत पद्धतीने स्वागत केले गेले. मतदानापूर्वी येथे जागरुकता शिबिरे घेतली गेली होती. यापूर्वी २०१९ मध्ये लोकसभेसाठी झालेल्या मतदानात ४७ मतदारांनी मतदान केले होते त्यात २९ पुरुष व १८ महिला मतदार होत्या. पूर्वी ४४४३ फुट उंचीवर असलेले हिकिम हे सर्वाधिक उंचीवरचे मतदान केंद्र होते मात्र आता टशीगंगने जगातील सर्वाधिक उंचीवरील मतदान केंद्र होण्याचा मान मिळविला आहे. या तुलनेत हिमाचलच्या शहरी भागात मतदानाचे प्रमाण ५० ते ६० टक्के होते. हिमाचल मध्ये सरासरी ७४ टक्के मतदान झाले आहे.