इव्हीएम मशीन्सची तिहेरी सुरक्षा, खर्च होणार ८ ते १० कोटी

हिमाचल प्रदेशातील विधानसभा मतदान पूर्ण झाले असून डिसेंबर मध्ये मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत ईव्हीएम मशीन्स कडेकोट बंदोबस्तात ठेवली गेली असून त्यांना तिहेरी संरक्षण दिले गेले आहे. निवडणूक आयोगाने त्यासाठी सर्व ६८ विधानसभा मतदारसंघात स्ट्रॉंग रूम्स तयार केल्या आहेत. सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर फुलप्रुफ पद्धतीने डबल लॉक लावली गेली असून आत बाहेर सीसीटीव्ही लावले गेले आहेत.

सर्व स्ट्राँगरूम भोवती तिहेरी पहारा असून त्यासाठी जवान तैनात केले गेले आहेत. चोवीस तास हे जवान येथे ईव्हीएम मशीन्सची सुरक्षा सांभाळणार आहेत. या तिहेरी वेढ्यात सर्वात बाहेर जिल्हा पोलीस जवान आहेत, दुसरा वेढा राज्य सशस्त्र पोलिसांचा आहे तर आत मध्ये सीएआरएफचे जवान २४ तास तैनात आहेत. या शिवाय राजकीय पक्षांना आवश्यक वाटल्यास त्यांचे एजंट नेमता येणार आहेत. सुमारे २५ ते २६ दिवस ईव्हीएमची सुरक्षा सांभाळावी लागणार असून हे सोपे काम नाही. त्यासाठी ८ ते १० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. एका स्ट्रॉंगरूम साठी साधारण ५० जवान नेमले गेले आहेत.