मुकेश अंबानी आता फुटबॉल क्लब खरेदीसाठी सज्ज

भारताचे धनकुबेर आणि बडे उद्योजक रिलायंस ग्रुपचे मुकेश अंबानी लवकरच इंग्लिश प्रीमिअर लीग मधील दिग्गज फुटबॉल टीमची खरेदी करणार असल्याचे वृत्त द मिररने दिले आहे. अंबानी लिव्हरपूल फुटबॉल क्लबच्या मालकीसाठी प्रयत्नशील असून सध्या या क्लबचे मालकी हक्क फेनवे स्पोर्ट्स ग्रुप कडे आहेत. त्यांनी या क्लबच्या विक्रीची तयारी सुरु केली असून या क्लबच्या विक्रीतून त्यांना ४ अब्ज पौंड म्हणजे ३८ हजार कोटींची अपेक्षा आहे. मुकेश अंबानी यांनी या क्लबच्या खरेदीत रुची दाखविली असल्याचे समजते.

अंबानी यांची एकूण संपत्ती ७.६ लाख कोटी आहे. इंग्लंडमधील या लोकप्रिय फुटबॉल क्लबचे अधिग्रहण करण्यासाठी त्यांना मिडिल इस्ट व युएस मधील अन्य गुंतवणूकदारांबरोबर स्पर्धा करावी लागणार आहे. यापूर्वी २०१० मध्ये अंबानी यांनी सहारा ग्रुपचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांच्या बरोबर मिळून लिव्हरपूल फुटबॉल क्लब खरेदी साठी बोली लावली होती पण त्यावेळी फनवे स्पोर्ट्सने बाजी मारली होती.

भारतात क्रिकेट खालोखाल फुटबॉल लोकप्रिय खेळ आहे. इंग्लिश प्रीमियम लीगचे भारतात सुद्धा अनेक चाहते आणि प्रशंसक आहेत. अंबानी यांनी आयपीएल मधील मुंबई इंडियनची खरेदी २००८ मध्ये करून वर्ल्ड क्रिकेट स्पोर्ट्स टीम ओनर बनण्याचा मान मिळविला आहे. रिलायंस सध्या तीन देशात तीन टी २० टीमचे मालक आहेत. बीसीसीआय च्या आयपीएल, अमिरात क्रिकेट बोर्डाच्या युएई टी २० लीग व द. आफ्रिकेच्या टी २० लीग टीम चे ते मालक आहेत. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे ते व्यावसायिक पार्टनर आहेत शिवाय इंडियन सुपर लीग फुटबॉलचे आयोजन रिलायंस तर्फे केले जाते.