पुतीन यांची जी २० परिषदेला अनुपस्थिती हत्येच्या भीतीमुळे?

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना सातत्याने त्यांची हत्या होईल अशी भीती सतावते आहे. यामुळेच इंडोनेशिया मध्ये १५ व १६ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या जी २० शिखर परिषदेसाठी पुतीन जाणार नसल्याचा दावा सेर्गे मार्कोव यांनी केला आहे. सेर्गे हे राजकीय विशेषज्ञ असून रशियन सरकारचे समर्थक आहेत.

सेर्गे मार्कोव्ह यांच्या म्हणण्यानुसार अमेरिका, ब्रिटन आणि युक्रेनी सेनेची खास दले पुतीन यांच्या हत्येचा कट रचू शकतात. बाली येथे होणार्या या परिषदेत बलाढ्य देशांचे प्रमुख सामील होणार आहेत. येथे पुतीन यांना अन्य देशांचे नेते अपमानित करतील अशीही आशंका आहे. यामुळेही पुतीन यांनी या परिषदेत सामील होणे टाळले असावे असेही म्हटले जात आहे. युक्रेन च्या खेरसोन येथून रशियन सैन्य माघारी फिरले आहे. त्यामुळे पुतीन यांची हत्या होण्याची शक्यता दाट झाली आहे. खरसोन मधून सैन्य माघारी हा पुतीन यांचा पराभव मानला जात आहे.

मार्कोव्ह यांनी यापूर्वीही युक्रेन युद्ध सुरु होताच देशाने संरक्षण उत्पादन वाढवून नवी मिसाईल बनविली पाहिजेत असा सल्ला दिला होता. युक्रेन युद्ध जिंकण्यास अपेक्षेपेक्षा सहा महिने उशीर झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या सर्व परिस्थितीत पुतीन इंडोनेशियाला गेले तर युक्रेन हल्ल्यानंतर पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन एकाच मंचावर येण्याची पहिलीच वेळ असेल.