असे चालते नियो बँकिंग

बँकिंग किंवा बँकेची कामे ही अनेकांना जटील समस्या वाटते. छोट्याश्या कामासाठी बँकेच्या शाखेत जाणे म्हणजे वेळ आणि पैसे खर्च अशीही अनेकांना भावना असते. तंत्रज्ञानाने ही समस्या मोठ्या प्रमाणावर सुटली असून बँकेच्या अनेक सेवा आणि सुविधा ऑनलाईन दिल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे कुठल्याही ठिकाणी बसून ग्राहक बँकेची अनेक प्रकारची कामे करू शकतो यालाच आपण डिजिटल बँकिंग म्हणतो.

पण आता टेक्नोलॉजीचा विकास वेगाने होत असताना बँकिंगची नवी सिस्टीम उदयास आली असून त्याला निओ बँकिंग असे म्हटले जाते. भारतात अश्या बँकिंगचे प्रमाण अद्याप फारसे नसले तरी त्याचा विकास वेगाने होत आहे. मुख्य म्हणजे या बँकिंग मध्ये फिजिकल शाखा नसतात. नियानुसार भारतात १०० टक्के डिजिटल बँकिंग होऊ शकत नाही त्यामुळे अश्या निओ बँकिंगला फिनटेक कंपनी स्वरुपात ओळखले जाते.

या बँकिंग मध्ये बँकेच्या सर्व सेवा मोबाईल अॅप वर मिळतात.पारंपारिक बँकांच्या सहकार्याने निओ बँकिंग सिस्टीम चालविली जाते. रिझर्व बँकेच्या नियमांचे पालन करून ही सुविधा दिली जाते आणि हे बँकिंग वेगवान, ग्राहक फ्रेंडली आणि खर्च कमी येणारे आहे. यात सेवा शुल्क कमी आकारले जाते. सर्व कामे डिजिटल स्वरुपात होत असल्याने श्रमबळाची गरज कमी होते आणि ग्राहकांचा वेळ  तसेच पैशांची बचत होते. या साठी ग्राहकाला बँकेत जावे लागत नाही. बँकेच्या सर्व सुविधा अॅप वर मिळतात. अनेक फिनटेक कंपन्या अशी सिस्टीम चालवीत आहेत.

रेझरपे एक्स, नियो, ओपन, एपीफाय, पेजेलो, येलो, इंस्टंट पे, हे स्टार्टअप एआय आणि अन्य तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहकांसाठी बँकिंग सरळ आणि सुविधाजनक बनवीत आहेत.