राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे देशाचे नेतृत्व करण्यास सक्षम-संजय राउत

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे त्यात सामील झाले आहेत. या संदर्भात पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात जामीन मिळून तुरुंगाबाहेर आलेले शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राउत यांनी राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे देशाचे नेतृत्व करण्यास सक्षम असल्याचे विधान शुक्रवारी केले आहे. हे दोन्ही युवा नेते भारत जोडो यात्रेत एकत्र आले आहेत यामुळे देशातील युवकांना नवी प्रेरणा मिळेल असेही ते म्हणाले.

एबीपी माझा बरोबर बोलताना राउत यांनी शुक्रवारी , शिवेनेतून बंड करून बाहेर गेलेले काही आमदार शिवसेनेत परत येतील असाही दावा केला. शिवसेनेतील नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या उठावात सेनेतील ४० आमदार सामील झाले आणि त्यामुळे उद्धव सरकार कोसळले असले तरी यातीलच काही आमदार सेनेत परत येण्याची तयारी करत असल्याचे राउत यांचे म्हणणे आहे.

पीएमपीएल न्यायालयाकडून राउत यांना जामीन मिळण्यास झालेल्या उशिराबद्दल बोलताना ते म्हणाले,’ अश्या केसेस मध्ये त्वरित जामीन दिला गेला पाहिजे. आम्ही म्हणजे कसाब किंवा अफझल गुरु नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याशी वैयक्तिक दुष्मनी नाही असे सांगताना त्यांनी गरिबांसाठी निवासासंदर्भात देवेंद्र यांनी घेतलेल्या काही निर्णयाचे कौतुक केले. आज देशात राजकीय शत्रूकडे देशाच्या शत्रू प्रमाणे पाहिले जाते, सरकार विरोधात काही लिहिले तर त्याला कायमचे संपविण्याचे प्रयत्न होतात असा आरोप केला. देशात या पूर्वी कधीही असे वातावरण नव्हते असेही ते म्हणाले.

तुरुंगात १ तास राहणे म्हणजे १०० दिवस राहण्याप्रमाणे आहे असे राउत यांचे म्हणणे आहे. येथे कोणत्याही सुविधा नाहीत असेही त्यांनी सांगितले.