रोहित शर्माच्या जागी कप्तानपदी या खेळाडूची लागू शकते वर्णी

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या आयसीसी टी २० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाला १० विकेट्सनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे टीम इंडिया ची नव्याने बांधणी होईल असे संदाज वर्तवले जात आहेत. सर्वप्रथम रोहित शर्माचे कप्तानपद जाईल हे निश्चित मानले जात असताना त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागेल याचेही अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.

बीसीसीआयने आगामी टी २०, २०२४ स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी काही कडक पावले उचलली जाणार असल्याचे संकेत तेथील काही अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यातूनच टीम इंडियाची कमान अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याच्या हाती सोपविली जाऊ शकते असे सूचित केले गेले आहे. इनसाईड स्पोर्ट वेबसाईट वर बीसीसीआयच्या अधिकाऱ्याचा हवाला देऊन ही बातमी दिली गेली आहे.

टीम इंडिया लगोलग न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार असून तेथे वनडे आणि टी २० सिरीज खेळणार आहे. त्यासाठी अगोदरच हार्दिक पंड्या कप्तान म्हणून निवडला गेला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि के एल राहुल यांना या दौऱ्यावर आराम दिला जाणार आहे. शिखर धवनकडे वन डे चे कप्तानपद सोपविले गेले आहे. १८ नोव्हेंबर रोजी पहिला टी २० सामना न्यूझीलंड मध्ये खेळला जाणार आहे.