मुंबईला दहशतवादी हल्ल्याचा इशारा- ड्रोन, हेलीकॉप्टरला बंदी

देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा दिला गेला असून १३ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या ३० दिवसांच्या काळात शहरात ड्रोन, रिमोट कंट्रोलने उडवीता येणारी हलकी विमाने, पॅराग्लायडर्स यांच्यावर प्रतिबंध घातले गेले आहेत. या शिवाय खासगी हेलीकॉप्टर्स, गरम हवेचे फुगे उडविण्यावर सुद्धा बंदी घातली गेली आहे.

मुंबई पोलिसांनी यावेळी वरील वस्तूंचा वापर करून मुंबईवर आकाशातून दहशतवादी हल्ला चढविला जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. २६ नोव्हेंबर २००८ मध्ये समुद्रमार्गे मुंबईवर केल्या गेलेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ लोक मृत्युमुखी पडले होते. मुंबई पोलिसांनी सीआरपीसीच्या कलम १४४ नुसार हे आदेश जारी केले असून आदेशाचे उल्लंघन केल्यास शिक्षा होऊ शकणार आहे.

दहशतवादी ड्रोन, रिमोट कंट्रोल हलकी विमाने, पॅराग्लायडर्सचा वापर करून अतिमहत्वाच्या व्यक्तींना निशाना बनवू शकतात आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करू शकतात तसेच सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करू शकतात व कायदा सुव्यवस्थेला आव्हान देऊ शकतात असा इशारा दिला गेला आहे.