केवळ या व्यक्तीच्या मुळे प्रत्यक्षात आले टी २० क्रिकेट फॉर्मेट

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी २० विश्वचषक सामन्यात टीम इंडिया स्पर्धेबाहेर गेल्याने अनेक क्रिकेट प्रेमी निराश झाले आहेत. आज टी २० साठी चाहते इतके पागल आहेत कि कसोटी आणि वनडे हे अन्य फॉर्मेट बरेच मागे पडले आहेत. टी २० ने प्रेक्षकांना अगदी वेड लावले आहे. पण क्रिकेटचे हे जादूई फॉर्मेट बनविणारा जादुगार फारसा कुणाला माहिती नाही.

१९९० च्या दशकात कौंटी क्रिकेटची लोकप्रियता इंग्लंड मध्ये घसरू लागली आणि प्रेक्षक स्टेडीयम कडे फिरकेनात. यामुळे इंग्लंड मधील स्टेडीयम नुकसानीत जाऊ लागली. याचा थेट परिणाम इंग्लंड व कौंटी क्रिकेट बोर्डाचा कमाईवर होऊ लागला होता. मैदानाकडे प्रेक्षकांना पुन्हा कसे खेचून आणायचे याचा विचार सुरु झाला. तेव्हा इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्टूअर्ट रॉबर्टसन याला बोलावणे पाठविले. हा तेव्हा मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम पाहत होता. प्रेक्षकांनी परत स्टेडीयमकडे आले पाहिजे म्हणून हा कामाला लागला.

स्टूअर्ट रॉबर्टसनने चक्क १ वर्षभर रिसर्च केला. लाखो क्रिकेट प्रेक्षकांना तो भेटला आणि स्टेडीयम मध्ये सामने पाहायला का येत नाहीत याची विचारणा केली. तेव्हा स्टेडीयम मध्ये सामान पाहणे बोरिंग आहे, वेळ खूप जातो आणि मोजलेल्या पैशाची किंमत वसूल होत नाही अशी अनेक उत्तरे त्याला मिळाली. या रिसर्च साठी त्याने २ लाख डॉलर्स खर्च केले आणि अखेर आपला अहवाल इंग्लंड क्रिकेट बोर्डाला दिला.

या अहवालात त्याने समस्येवरचा उपाय म्हणून टी २० क्रिकेट फोर्मेटचा उपाय सुचविला होता. त्यासाठी नियम बनविले होते. २० ओव्हरच्या या सामन्यात रोमांच होता. अर्थात सुरवातीला या फोर्मेटला क्रिकेट बोर्डाने नाके मुरडली पण रोबर्टसनने मार्केटिंग विभागाला मदतीला घेऊन पूर्ण योजना बनविली. टीव्ही वर त्याची आकर्षक पद्धतीने जाहिरात केली. त्यामुळे अखेर या फोर्मेट ला मान्यता दिली गेली. २००३ मध्ये प्रथम इंग्लंड मध्ये  कौंटी क्रिकेट क्लबने टी २० चँपियन स्पर्धा भरविली. त्याला प्रेक्षकांनी तुडुंब प्रतिसाद दिला. सामन्यांची सर्व तिकिटे संपली आणि मोठी रक्कम गोळा झाली. शिवाय जाहिराती टीव्हीवर आल्याने प्रसार होऊन हे फॉर्मेट हिट झाले. त्याचा फायदा उठवत आयसीसीने २००७ मध्ये टी २० वर्ल्ड कप सामने सुरु केले.

विशेष म्हणजे या पहिल्या टी २० वर्ल्ड कपचा विजेता होता महेंद्र सिंग धोनी याच्या कप्तानी खाली खेळलेला भारतीय संघ.