तब्बल १०२ दिवसांनंतर संजय राउत जामिनावर सुटले

आर्थर रोड तुरुंगात १०२ दिवस काढल्यावर अखेर पत्रा चाळ घोटाळ्यात ईडीने अटक केलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राउत यांना पीएमएल न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तुरुंगाबाहेर राउत समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दादर येथील शिवसेना भवनावर संजय राउत यांच्या सुटकेनंतर जल्लोष साजरा केला गेला आणि फटाक्यांची आतषबाजी केली गेली.

संजय राउत यांचे भाऊ सुनील राउत म्हणाले, संजय यांची तब्येत बरी नाही त्यामुळे त्यांना प्रथम हॉस्पिटल मध्ये चेक अप साठी नेले जाणार आहे. त्यानंतर ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन वंदन करतील आणि मग मातोश्री वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. शिवसेना समर्थकांनी राउत यांची सुटका होताच मोठ मोठे पोस्टर्स लावले असून त्यावर’ टायगर इज बॅक’ अशी अक्षरे आहेत.

संजय राउत यांनी पत्रकारांना ते सर्वांशी बोलणार असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले ,‘माझी तब्येत बरी नाही. चुकीच्या पद्धतीने मला अटक केल्याचे मी वारंवार सांगत होतो . आता न्यायालयाने सुद्धा हे स्वीकारले आहे. माझा न्यायसंस्थेवर पूर्ण विश्वास आहे.’ याच प्रकरणात प्रवीण राउत यानाही अटक झाली होती, त्यानाही न्यायालयाने जामिनावर सोडले आहे.

२००७ मध्ये सुरु झालेल्या पत्राचाळ घोटाळ्यात म्हाडा, प्रवीण राउत, गुरु आशिष कन्सस्ट्रक्शन व हौसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांनी परस्पर संमतीने तेथील रहिवाशांना नव्या जागा न देता परस्पर बाहेर विकल्याचा आरोप आहे.