मोठ्या भूकंपात तसूभर सुद्धा हलणार नाही ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’

नेपाळ आणि उत्तर भारतातील दिल्ली सह अनेक राज्यांत भूकंपाचे झटके बसले आहेत. भारतात वारंवार भूकंप होतात. मात्र जगातील सर्वात उंचीचा गुजराथेत उभारला गेलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ मोठ्या भूकंपात सुद्धा स्थिर राहणार आहे. ३१ ऑक्टोबर २०१८ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण केले गेले असून हा पुतळा १८२ फुट उंचीचा आहे. गुजराथच्या नर्मदा तीरावरील कावेडिया मध्ये हा पुतळा असून तो ७ किमी अंतरावरून सुद्धा दिसतो.

पुतळ्याच्या उभारणीसाठी ३०० अभियंते आणि सुमारे ३ हजार कामगार सतत साडेतीन वर्षे काम करत होते. लार्सन टुब्रो ने सरदारांची ही भव्य प्रतिमा उभारण्यात मोठे योगदान दिले आहे.या पुतळ्यासाठी ७० हजार टन सिमेंट, २५ हजार टन स्टील, १२ हजार टन तांबे, १७०० टन अन्य वजन वापरले गेले आहे. पुतळ्याच्या पायाला आधार देण्यासाठी १२९ टन लोखंड वापरले गेले असून हे सर्व लोखंड १० कोटी शेतकऱ्यांनी त्यांच्या भंगार लोखंडातून दान म्हणून दिले आहे.

या पुतळ्याचे डिझाईन असे केले आहे कि ६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला किंवा १२० किमी वेगाने वादळी वारे वाहिले तरी हा पुतळा तसूभर सुद्धा हलणार नाही. वर्षे उलटतील तसा या पुतळ्याचा रंग हिरवट होत जाणार आहे कारण पुतळ्यात तांबे वापरले गेले आहे. अमेरिकेतील स्टॅच्यु ऑफ लिबर्टी पुतळा सुद्धा ३० वर्षे लोटल्यावर हिरवट रंगाचा झाला आहे. स्टॅच्यु ऑफ युनिटी’ मध्ये हायस्पीड लिफ्ट बसविली गेली असून त्यातून ३० सेकंदात २६ लोक टॉपवर पोहोचू शकतात.. रोज सायंकाळी ७ वा. येथे लेझर शो केला जातो तो फार प्रेक्षणीय आहे.