५० खोके- ओके, आरोपाला शिंदे गटाचे २५०० कोटींचे उत्तर

महाराष्टात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे गट आणि भाजपचे सरकार आल्याला चार महिने होत असताना शिंदे गटाने महाविकास आघाडीच्या काही नेत्यांकडून सातत्याने होत असलेल्या ’५० खोके एकदम ओके” आरोपाला २५०० कोटींचे उत्तर देण्याचे निर्णय घेतला आहे. शिवसेनेतून फुटून निघालेल्या आणि काही अपक्ष मिळून ५० च्या संख्येने सत्तेतून बाहेर पडलेल्या आमदारांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांनी ५० -५० कोटी घेऊन भाजपला समर्थन दिल्याचे आरोप सातत्याने केले जात आहेत. आजपर्यंत शिंदे गटाकडून त्याला कधीच उत्तर दिले गेले नव्हते.

मात्र आता असे आरोप करणाऱ्या महाविकास आघडीच्या नेत्यांना घेरण्याची योजना बनविली गेले असून मुख्यमंत्री शिंदे यांनी विजय शिवतारे यांची नवे प्रवक्ते म्हणून निवड केली आहे. या संदर्भात विजय शिवतारे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात बोलताना त्यांनी सांगितले,’ शिवसेना नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि अन्य काही नेते, बंड केलेल्या आमदारांनी ५०-५० कोटी घेतल्याचे आरोप करत आहेत. आत्ता त्यांना या संदर्भात बुधवारी नोटीस दिली जात आहे. त्यात आरोप सिद्ध करा अन्यथा २५०० कोटीची मानहानी केस लढण्यास तयार रहा’ असा इशारा दिला जात आहे.

५० आमदारांनी ५०-५० कोटी घेतल्याचे आरोप या नेत्यांनी केले आहेत. ते त्यांना सिद्ध करता आले नाहीत तर प्रत्येक आमदाराच्या मानहानीचे ५० कोटी असे २५०० कोटीचा दावा न्यायालयात दाखल केला जाणार आहे असे शिवतारे यांनी सांगितले.