आलिया रणबीर कन्येसाठी पाकिस्तानातून आली मागणी

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या घरी दोन दिवसांपूर्वी छोट्या परीचे आगमन झाल्याने सर्व परिवार आनंदोत्सव साजरा करण्याच्या मूड मध्ये आहे. आपल्याकडे प्राचीन काळापासून कन्या हे परक्याचे धन मानले जाते आणि मुलीच्या जन्मापासूनच प्रत्येक पिता तिची पाठवणी करावी लागणार म्हणून कासावीस होत असतो. रणबीर कपूरला सुद्धा मुलीला पाहिल्यावर अश्रू अनावर झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. यामागे या चिमुकलीला सरहदी पलीकडून आलेली मागणी कारण असावी काय याची चर्चा सुरु झाली आहे.

पाकिस्तानचा प्रसिद्ध अभिनेता, व्हीजे आणि होस्ट यासिर हुसेन याने आलिया रणबीरच्या कन्येच्या जन्मानंतर केलेल्या एका पोस्ट मध्ये,’ आज कबीर फार खूश आहे. दोन्ही देशांच्या मैत्रीसाठी तयार आहे’ असे लिहिले होते. पण त्यामागचा उद्देश जेव्हा स्पष्ट झाला तेव्हापासून ही पोस्ट वेगाने व्हायरल झाली आहे. यासिर ने त्याचा मुलगा कबीर साठी आलिया रणबीरच्या नवजात कन्येचा हात मागितला आहे. यासिर पाकिस्तानमधील प्रसिद्ध कलाकार असून त्याने अभिनेत्री इकरा अजीज हिच्यासोबत २०१९ मध्ये निकाह केला आहे. त्यावेळी हा विवाह खूप चर्चेत आला होता. या जोडप्याला २०२१ मध्ये मुलगा झाला असून त्याचे नाव कबीर आहे.