१३ वर्षाची सफल हेरगिरी करून पृथ्वीवर परतला भारतीय हेर

देशाचा पहिला स्पाय उपग्रह, ‘ आय इन द स्काय’ १३ वर्षे ६ महिन्याची यशस्वी हेरगिरी करून पृथ्वीवर परतला आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अंतराळातून नजर ठेवण्याचे महत्वाचे काम त्याने केले आहे. इस्रोने हा पहिला रडार इमेजिंग सॅटेलाईट मुंबई वर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्वरित लाँच केला होता. देशाच्या सीमा आणि समुद्र सुरक्षित राखण्याबरोबर पाकिस्तानवरील दोन सर्जिकल स्ट्राईक योजना बनविण्यात हा अंतराळ हेराचे योगदान फार मोठे होते.

पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईकच्या योजना आखताना या उपग्रहाने पाठविलेल्या फोटोचा वापर केला गेला होता. ‘रिसॅट टू’ नावाच्या या उपग्रहाने साडे तेरा वर्षे अनेक घुसखोरी विरोधी आणि दहशतवादी विरोधी मोहिमात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या उपग्रहाने पाठविलेल्या इमेजेसचा वापर करून गुप्तचर संस्थाना २०१६ मध्ये पाक व्याप्त काश्मीर मधील दहशतवादी लाँच पॅड व फेब्रुवारी २०१९ बालाकोट हवाई हल्ला योजना आखणे सुलभ झाले होते.

२००८ मध्ये २६/११ अंतर रिसॅट २ च्या कार्यक्रमाला वेग दिला गेला होता कारण भारताचा स्वदेशी उपग्रह रिसॅट एक चा ‘सी बँड’ विकसीत करण्यास उशीर होत होता म्हणून रिसॅट दोन त्यापूर्वीच तीन वर्षे म्हणजे २००९ मध्ये लाँच केला गेला. हिंद महासागर आणि अरबी समुद्रात शत्रूची जहाजे ट्रॅक करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला गेला होता.