हे आहेत भारतातले काही सुंदर हायवेज

देशात रस्ते सुधारणा अतिशय वेगाने होत असून परदेशाच्या तोडीचे रस्ते भारतात बनत आहेत. त्यातील काही हायवे तर आवर्जून एकदा तरी त्यावरून प्रवास केलाच पाहिजे असे आहेत. या हायवेज वर रोमांच, साहस, निसर्गसौंदर्य, प्रवासाचा आनंद आणि फोटो काढण्यासाठीच्या अनेक जागा तुम्हाला मिळतात.

यात प्रथम क्रमांकावर येतो तो कन्याकुमारी काश्मीर हा तब्बल ३९४५ किमी लांबीचा महामार्ग. देशाच्या ११ राज्यातून अनेक अनेक महत्वाच्या शहरातून जातो. चेनानी नाशारी हा देशातील सर्वाधिक लांबीचा बोगदा याच मार्गावर आहे. कल्पनाही करता येणार नाही अशी अनेक सुंदर स्थळे, जागा या महामार्गावर आहेत.

मुंबई गोवा हा रस्ता अनेक चित्रपटातून अनेकदा दिसलेला आहे. मुंबई गोवा महामार्गावर अनेकांनी प्रवास केलाही असेल. दोस्त मंडळीच्या समवेत या रस्त्याची सफर एकदा तरी करायला हवीच. पश्चिम घाटाचे सौंदर्य नजरेचे पारणे फेडणारे आहे. मुंबई पुणे महामार्ग हा काही अॅडव्हेंचरस रोड नाही पण आकर्षक नक्कीच आहे. हिरवाई, डोंगर दऱ्या, पावसाळ्यात धबधबे आणि प्रचंड वाहतूक हि याची वैशिष्टे म्हणता येतील.

मनाली लेह महामार्ग मात्र अॅडव्हेंचरस म्हणावा असाच आहे, नितांत सुंदर निसर्ग, जीवघेणी अवघड वळणे, हिमालयाच्या शिखराची साथ असलेल्या या रस्त्यावर बाईकर्स प्रचंड एन्जॉय करतात. येथील प्रवासाचा अनुभव असाधारण आहे. हा महामार्ग ४७३ किमी चा आहे. येथे किती ठिकाणी फोटो काढू याला काही मर्यादा राहत नाही.

चेन्नई पुद्दुचेरी या त्या उलट समुद्री किनाऱ्याची सोबत असलेला सुंदर महामार्ग. हे अंतर कमी आहे पण या रस्त्यावर निसर्ग नुसता बहरून ओसंडला आहे. येथे अनेक जागा आवर्जून थांबून पाहाव्या अश्या आहेत. त्यात आमपराई किल्लाही येतो. १५२ किमी चा हा रस्ता एकदातरी अनुभवायला हवा.