आले आकर्षक, चिटूकले टीव्ही

टीव्ही आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. टीव्हीच्या रंगरूपात मोठा बदल झाला आहे. पूर्वीचे बोजड, ब्लॅक व्हाईट टीव्ही जाऊन आता मोठ्या स्क्रीनचे अगदी सडपातळ टीव्ही घरोघरी विराजमान झाले आहेत. अश्यात टायनी सर्किट्स नावाच्या एका हार्डवेअर कंपनीने खेळण्यातील वाटावेत असे टीव्ही बाजारात आणले आहेत. टायनी सर्किट्स ही खास इलेक्ट्रोनिक्स डिव्हायसेस बनविणारी हार्डवेअर कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.

कंपनीने हे चिमुकले टीव्ही टायनी टू आणि टायनी मिनी नावाने सादर केले आहेत. दिसायला खेळण्यातले वाटले तरी हे टीव्ही मोठ्या टीव्हींच्या तुलनेत कुठेच कमी नाहीत. या टीव्हीचा लुक जुन्या टीव्हीची आठवण करून देणारा आहे आणि आकार आहे पोस्टाच्या तिकीटाएवढा. हे टीव्ही सर्वसामान्य टीव्ही प्रमाणेच चालतात. त्यांना चॅनल, व्हॉल्यूम कंट्रोल साठी बटणे आहेत. रिमोट कंट्रोल आहे आणि स्टोरेज स्पेस ८ जीबी आहे.

संगणकाला कनेक्ट केले तर त्यावर व्हिडीओ अपलोड करता येतात. हे टीव्ही बॅटरी वर चालतात आणि त्यात दोन तास व्हिडीओ प्ले करता येतो. या टीव्हीचा डिस्प्ले १ इंचाचा आहे. आणि त्याला ०.६ ते ०.४ इंचाचे स्पीकर दिले गेले आहेत. हे टीव्ही अगोदरच काही व्हिडीओ अपलोड करून मिळणार असून नवीन व्हिडीओ त्यात नंतर अपलोड करता येणार आहेत. जगातील सर्वात छोटा टीव्ही म्हणूनच त्याचे प्रमोशन केले जात असून त्यांच्या किमती ४९ डॉलर्स ते ५९ डॉलर्स म्हणजे ४ ते ५ हजार रुपये आहेत. अर्थात १० डॉलर्स म्हणजे १ हजार रुपये खर्च करून रिमोट वेगळा खरेदी करावा लागणार आहे.