ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली हजारो कोटींचा गैरव्यवहार

नवी दिल्ली: सध्याच्या काळात ऑनलाईन गेमिंग हा प्रकार विशेषत: युवा वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत असला तरी या आभासी खेळांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार होत असल्याची बाब उघड झाली आहे. अशा अनेक प्रकरणांचा तपास सक्तवसुली संचालनालय (ईडी) करीत आहे.

अशा मोबाईल गेमिंगच्या गैरकारभारात चिनी कंपन्या आघाडीवर असून त्यांच्या मार्फत थेट विदेशी गुंतवणुकीच्या नावाखाली भारतीय कंपन्यांना मूळ भांडवल पुरवले जाते. विविध मोबाईल ॲपद्वारे पैसे जमा करण्याचे काम भारतीय कंपन्या करतात. बहुतेकदा ही ॲप्स आर्थिक गैरव्यवहारामुळे गुगल प्ले स्टोअरने काढून टाकलेली असतात.

भारतीय कंपन्या बनावट बँक खाती, हवाला अथवा आभासी चलनाचा वापर करून जमा केलेली रक्कम मूळ कंपन्यांना पाठवितात. अशा प्रकारे चीन, सिंगापूर आणि हाँगकाँग या देशांमध्ये हजारो कोटी रुपये पाठविण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

अशा गैव्यवहारप्रकरणी ईडीने लिंक्यून टेक्नॉलॉजी, डोकिपे टेक्नॉलॉजी, कोडा पेमेट्स इंडिया, जेरेना फ्री फायर मोबाईल गेम, ई नगेट्स गेमिंग ॲप यांच्यावर गुन्हे दाखल केले असून अनेक चिनी आणि भारतीय संबंधितांना अटक केली आहे. या सर्व प्रकरणातील गैरव्यवहारांची रक्कम ८ हजार कोटी रुपयांहून अधिक आहे.