टी २० वर्ल्ड कप, विजेत्यावर पडणार पैशाचा पाऊस

ऑस्ट्रेलिया मध्ये खेळल्या जात असलेल्या आयसीसी टी २० वर्ल्ड कप मध्ये भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ उपांत्य फेरीत आले आहेत आणि यातूनच दोन संघ अंतिम सामना खेळणार आहेत. कोणते दोन देश अंतिम फेरीत येणार याची प्रतीक्षा आणखी ६ दिवस करावी लागणार आहे. टी २० वर्ल्ड कप विजेत्यावर पैशाचा अक्षरशः पाउस पडणार आहे. विजेत्याला चमचमत्या ट्रॉफी सोबत १६ लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजे १३ कोटी ११ लाख ७२ हजार रुपये बक्षीस मिळणार आहे तर उपविजेत्याला ८ लाख डॉलर्स म्हणजे ६ कोटी ५५ लाख ८६ हजार रुपये मिळणार आहेत.

याच बरोबर उपांत्य सामन्यात दाखल झालेल्या वरील चार संघाना ४-४ लाख डॉलर्स म्हणजे साधारण ३ कोटी ३० लाख रूपये मिळणार आहेत. उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये होणार असून त्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे. हा सामना अॅडलेड येथे १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. भारत अंतिम फेरीत पोहोचून विजेता ठरला, तर भारताचा हा टी २० वर्ल्ड कप मधला दुसरा आणि पंधरा वर्षांच्या अंतराने मिळविलेला विजय असेल.

यापूर्वी २००७ मध्ये महिंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी २० वर्ल्ड कप जिंकला होता.