विजय मल्ल्याची भूमिका साकारणार अनुराग कश्यप

बॉलीवूडचा सुप्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची प्रतिभा दाखवणार आहे. यावेळी तो देशातील फरारी उद्योगपती विजय मल्ल्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘शिवाजी’, ‘अपरचित’ आणि ‘2.0’ सारख्या चित्रपटांमध्ये प्रसिद्ध दक्षिण भारतीय दिग्दर्शक शंकर यांचा सहाय्यक असलेल्या कार्तिकने अनुरागला त्याच्या चित्रपटात ही भूमिका दिली आहे.

कार्तिक विजय मल्ल्या प्रकरणावर ‘फाइल नंबर 323’ चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. हा चित्रपट भारतातील फरार आर्थिक घोटाळेबाज यांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित सूत्रांनी सांगितले की ‘फाइल नंबर 323’ चित्रपटात विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांसारख्या आघाडीच्या उद्योगपतींचे वास्तविक जीवनातील घोटाळे दाखवले जाणार आहेत. मात्र, चित्रपटाची मुख्य कथा विजय मल्ल्या यांच्यावर केंद्रीत असणार असून विजय मल्ल्या यांच्या जीवनाशी संबंधित सर्व पैलू यात दाखवले जाणार आहेत. यामध्ये त्यांची शाही उड्डाणे, पार्ट्या आणि चार्टर्ड विमानातील वाद एखाद्या मसालेदार चित्रपटाप्रमाणे मांडण्यात येणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 20 नोव्हेंबरपासून या चित्रपटाचे शूटिंग मुंबईत सुरू होणार आहे.या फिल्मचे यूकेसह विविध युरोपियन देशांमध्ये शूटिंग होणार आहे . या चित्रपटातील नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या पात्रांसाठीही काही लोकप्रिय नावांचा शोध घेतला जात आहे. ‘फाइल नंबर 323’ हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.